रोजगार हमी भ्रष्टाचार प्रकरणात आकडा फुगण्याची शक्यता

0
16

सिंदेवाही,दि.१४- तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायतअंतर्गत रोजगार हमीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले असून अजुनही आरोपीला अटक झाली नाही. या प्रकरणात भ्रष्टाचाराच्या रकमेचा आकडा फुगण्याची शक्यता आहे.रोजगार हमीच्या कामामध्ये रोजगारसेवक शशिकांत गिरडकर याने भ्रष्टाचार केल्याची ओरड होत असताना रोजगार हमीच्या कामामध्ये किती भ्रष्टाचार झाला यासाठी तालुकास्तरीय समिती, जिल्हास्तरीय समितीकडून सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यामध्ये २ लाख चार हजार ९३५ रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तक्रारकर्त्यांसह आतापर्यंत २३ लोकांचे बयाण घेण्यात आले असून १६ नागरिक बयाणासाठी चौकशी समितीसमोर हजर होऊ शकले नाहीत.

जिल्हास्तरीय समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे. यामध्ये अनियमितता, बोगस मजूर, रोजगारसेवकाने स्वत:चे खाते क्रमांक टाकून परस्पर रक्कम उचलणे असे प्रकार समोर आलेले आहे.

संगीता गिरडकर यांच्या जॉबकार्डवर इतर खोटी नावे टाकून व स्वत:च्या खाते क्रमांक टाकून रोजगार सेवकाने ६०,८४२ रुपये उचलले. तसेच आकाश पोहनकर यांच्या जॉबकार्डवर इतर इंग्रजी-मराठी नावे टाकून व स्वत:चे खाते क्रमांक देऊन ७०,९८८ रुपये रोजगार सेवक शशिकांत गिरडकर यांनी एकुण १३१८३० रुपये स्वत:च्या नावानी उचलले तसेच काही मजूर कामावर न जाताही त्यांची हजेरी लावण्यात आली असून त्या-त्या व्यक्तीच्या खात्यावरील रक्कम परस्पर उचलली आहे. ती रक्कम आम्ही उचलली नाही, असे काहींनी सांगितले.

परंतु ती रक्कम जॉबकार्डधारकांच्या खात्यातून उचलली असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. ही रक्कम नेमकी कुणी बँक खात्यातून काढली, हे गुलदस्त्यात आहे. परंतु सदर रक्कम ज्या-ज्या जॉबकार्डधारकांच्या खात्यातून उचलली आहे, त्यांच्याकडून वसूल करण्याची शिफारसही चौकशी समितीने केली आहे.चौकशी अहवालामध्ये आतापर्यंत २ लाख ४ हजार ९३५ रुपयांचा अपहार झाला असला तरी याबाबत अधिक चौकशी झाली तर आकडा फुगण्याची शक्यता असल्याने सदर ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराची आर्थिक गुन्हे शाखेकडून विशेष तपासणी करण्याची शिफारस चौकशी समितीकडून करण्यात आली आहे.