दोन राष्ट्रीय विक्रमांसह महाराष्ट्राला तीन सुवर्ण

0
11

पुणे दि.१४: राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत दहा वर्षाखालील मुलींच्या गटात फ्रीस्टाईल रिले स्पर्धेत महाराष्ट्राने स्वत:चाच विक्रम मोडत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत स्पर्धेचा पहिला दिवस गाजविला. तर २०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या रायना सलढाणा हिने नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली व संजिती सहा हिने ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण पटकावले. वॉटरपोलो स्पर्धेत महाराष्ट्राने १८ वर्षे वयोगटात विजयी सलामी दिली. त्याचवेळी विविध ८ प्रकारात अव्वल क्रमांक पटकावत कर्नाटकने दिवसावर वर्चस्व राखले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथे सोमवार पासून या स्पर्धेस सुरुवात झाली. फ्रीस्टाईल रिले प्रकारात २००८ साली महाराष्ट्राच्या (२:१५:३० मि) नावे विक्रम होता. महाराष्ट्राच्या पलक धामी, संजिती साहा, इवांका शहा, अन्वेषा जोहरे (२:११:३०) यांनी नव्या विक्रमाची नोंद केली. वॉटरपोलो स्पर्धेत महाराष्ट्राने कर्नाटकचा ११-३ असा धुव्वा उडवित विजयी सलामी दिली. कर्णधार सारंग वैद्यने ५ गोल नोंदवित संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शिवम घाडगे, यश जाधव यांनी प्रत्येकी २, तर सुयोग आमगावकर, वैभव कुटे यांनी प्रत्येकी १ गोल नोंदविला. कर्नाटक संघाकडून धनुषने तीन गोल केले.
दुसऱ्या लढतीत पंजाबने मणिपूरचा ११-२ असा एकतर्फी पराभव केला. पंजाबच्या नसीब धिलॉं, देशदीप सिंग यांनी प्रत्येकी ३, कणवीरसिंगने २, भवरजित, परमपालसिंग, एकज्योतसिंग यांनी प्रत्येकी १ गोल नोंदविला. सी. एच. अजय सिंग, एल. हिल्लन मानगँग यांनी प्रत्येकी १ गोल केला.
अन्य एका लढतीत केरळने दिल्लीचा १०-२ असा पराभव केला. मिधुनने ३, एल गोकुक व एस आनंद यांनी प्रत्येकी २, तर एस. प्रकाश, सिबिन व्ही, नरेंद्र पी यांनी प्रत्येकी १ गोल नोंदविला. दिल्लीकडून प्रियांक व सुनित यांनी प्रत्येकी १ गोल केला. बंगालने तेलंगानावर ९-० असा शानदार विजय नोंदविला.

विक्रमी यश :

२०० मीटर फ्री स्टाईल मुली : रायना सलढाणा-महाराष्ट्र (२:११:९४), अन्नई जैन-मध्यप्रदेश (२:१९:२४), भाविका डुगर-तमिळनाडू (२:२०:९६), मुले १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक : लिखित एसपी-कर्नाटका (१:०५,७५), अंश अरोरा-उत्तरप्रदेश (१:०६:३५), वैष्णव हेगडे-कर्नाटका (१:०८:२१), मुले ५० मीटर बॅकस्ट्रोक : वेदांत सेठ-दिल्ली (२७:६५), मुकुंधान पी-तमिळनाडू (२८:५५), जॅसन स्मिथ-महाराष्ट्र (२८:७९), ५० मीटर बॅकस्ट्रोक : झेव्हीयर डिसुझा-गोवा (२८:८९), नील रॉय-महाराष्ट्र (२९:४१), एन. श्री. हरी-कर्नाटका (२९:४४), ५० मीटर बॅकस्ट्रोक महिला : माना पटेल-गुजरात (३०:०३), निव्या राजा-तमिळनाडू (३१:९७), युगा बिरनाळे-महाराष्ट्र (३२:५२), ४ बाय ५० मीटर फ्रीस्टाईल मुली : महाराट्र (२:११:३०), कर्नाटका (२:१५:९२), तमिळनाडू (२:१७:४८).