गडचिरोली,दि.04ःगोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे प्रथम कुलसचिव प्राचार्य डॉ.विनायक इरपाते यांचे सोमवारला दुपारी नागपूर येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचेवर नुकतीच एन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. ऑक्टोबर 2011 मध्ये गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाल्यावर डॉ.विनायक इरपाते यांची प्रथम कुलसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. तत्पूर्वी ते माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या पारशिवणी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात प्राचार्य होते. 12 ऑगस्ट 2016 रोजी डॉ. इरपाते यांनी कुलसचिव पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुनश्च ते आपल्या मूळ पदस्थापनेवर रुजू झाले.
डॉ. इरपाते हे चंद्रपूर जिल्ह्य़ातील नागभिड तालुक्यातील कोथुळणा येथील मूळ रहिवासी होते. 2005 मध्ये त्यांनी पीएच.डी. मिळविली. त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनात्मक पेपरसुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. ‘माडिया गोंड समाजातील महिलांचा बदलता दर्जा’ या विषयावर त्यांनी आचार्य पदवीकरिता शोधप्रबंध सादर केला होता. 2001 ते 2005 पर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विधिसभा सदस्य व विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर त्यांनी काम केले होते. 1991 ते 2006 पर्यंत डॉ. इरपाते कामठीच्या एस.के. पोरवाल महाविद्यालयात प्राध्यापक होते. डॉ. इरपाते हे विदर्भ वनवासी कल्याण आश्रमाचे काही काळ अध्यक्ष होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटचे होते. ते कुलसचिव असताना 2014 साली त्यांना भाजप कडून विधानसभेची ऊमेदवारी देण्याचे जवळ-जवळ निश्चित झाले होते. परंतु त्यांनी ती नाकारली होती. आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात दु:ख व्यक्त केले जात आहे.
.