23.4 C
Gondiā
Thursday, July 10, 2025
Home Blog Page 5

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा धानोरा तालुक्यात ऑनफिल्ड

0

आपत्ती व्यवस्थापन, मलेरिया नियंत्रण व आरोग्य विषयक उपाययोजनांचा आढावा

गडचिरोली,दि.07 : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज धानोरा तालुक्यात भेट देत आपत्ती व्यवस्थापन, मलेरिया नियंत्रण, राष्ट्रीय महामार्ग व महसूल यंत्रणा आणि आरोग्य विषयक उपाययोजनांचा आढावा घेतला. पावसाळी काळात तालुक्यातील प्रशासनाच्या विविध यंत्रणांना अधिक सक्रिय व सजग राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
तहसील कार्यालय धानोरा येथे आयोजित आढावा बैठकीत सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रणजित यादव, तहसिलदार आम्रपाली लोखंडे तसेच तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
पूरप्रवण गावांसाठी नवसंजीवनी योजनेतून धान्य पोहोचले का याची चौकशी 
मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीचा विचार करता, पूराच्या काळात संपर्क तुटणाऱ्या
गावांसाठी ;नवसंजीवनी योजना; अंतर्गत आवश्यक धान्य व औषधी उपलब्ध झाले का याबाबत जिल्हाधिकारी
पंडा यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. आपत्ती व्यवस्थापण यंत्रणेने सजग राहण्याचे व पूरप्रवण ठिकाणी
संभाव्य धोका निर्माण झाल्यास तातडीने वरिष्ठ प्रशासनाला कळविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मलेरिया प्रतिबंध व स्वच्छतेवर भर
पावसाळी कालावधीत मलेरिया व इतर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य विभागाने
आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली. पावसाळ्यात ठिकठिकाणी ब्लिचिंग
पावडरचा वापर करून परिसराची स्वच्छता राखणे, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, ओलसर
परिसरात डासांचे निर्मूलन करणे आदी बाबींचे काटेकोर पालन करण्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गाची पाहणी
धानोरा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या स्थितीकडे लक्ष वेधत जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांची
गैरसोय टाळण्यासाठी तातडीने डागडुजी करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासंबंधात
नागरिकांच्या तक्रारी असून महामार्गाची दुरूस्ती व यासंबंधातील समस्या सोडविण्यासाठी महामार्ग
प्राधिकरणाद्वारे गडचिरोली येथे किमान एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी
राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्यालयाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून केली.
आश्रमशाळांमधील सुविधांची तपासणी

जिल्हाधिकाऱ्यांनी धानोरा तालुक्याील सोडे येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळा व मुलींचे वसतीगृहाला
भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या अभ्यास, पोषण आणि सुविधा याबाबत माहिती
घेतली. तसेच अशा शाळांमध्ये नाविन्यपूर्ण काय उपक्रम राबविता येतील याविषयी चर्चा केली.
शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा व एकलव्य निवासी शाळेची पाहणी
या दौऱ्यादरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा गडचिरोली व सेमाना येथील एकलव्य निवासी
शाळेचीही त्यांनी पाहणी केली. येथे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक व निवासी सुविधांचा आढावा
घेतला आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपाययोजना राबवण्याचे
सांगितले.

राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई/गोंदिया,दि.7: राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंधनियुक्ती नियम (रिक्रुटमेंट रूल) सुधारित करणेअनुकंपा तत्वावरील भरती १०० टक्के करणेआदी उद्दिष्टे दिली आहेत. या उद्दिष्ट पूर्तीनंतर रिक्त पदांची निश्चित माहिती समोर आल्यावर या रिक्त पदांसाठी राज्य शासन ‘मेगा भरती‘ करेलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांच्या भरतीबाबत सदस्य भीमराव केराम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेदरम्यान सदस्य डॉ. नितीन राऊतनाना पटोलेभास्कर जाधवसुरेश धस यांनीही उपप्रश्न उपस्थिती केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमागील काळात शासनाने ७५ हजार पदभरतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार एक लाखांपेक्षा जास्त पदांची भरती करण्यात आली. शासन पदभरतीबाबत कुठेही मागे पुढे पाहणार नाही. राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील ६,८६० पदांवर जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेले कार्यरत आहे. मात्र त्यांना २० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. अशा पदांबाबत शासनाने मानवतापूर्ण दृष्टीने विचार करीत ही पदे अधिसंख्य केली. या पदावर कार्यरत असलेल्यांना बढती मिळणार नाही. पण शासन त्यांना पदावरून कमीही करणार नाही. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही पदे व्यपगत होतील. अनुसूचित जमाती प्रवर्गातील बिंदूनामावलीनुसार एकही राखीव पद रिक्त ठेवण्यात येणार नाही.

अधिसंख्य असलेली ६ हजार ८६० पदे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी भरती करण्याकरिता रिक्त झालेली आहे. त्यापैकी १३४३ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पदांवर भरती केलेली आहे. उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ब्लॉक चेन पद्धतीवर अभिलेख आणण्याबाबत शासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी करताना कागदपत्रे तपासणे सोयीचे होईल. तसेच जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना सक्षम करण्यात येत आहे. अधिक वेगाने आणि पारदर्शकपणे वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत सचिवांचा गट तयार करण्यात येईल. या गटाच्या माध्यमातून अभ्यास करून कार्यवाही करण्यात येईलअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेसर्वोच्च न्यायालयाने सफाई कामगारांची पदे वारसा हक्काने भरण्याबाबत असलेली स्थगिती उठवलेली आहे. लाड – पागे समितीच्या शिफारशीनुसार ही पदे वारसा हक्काने भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या पदांसाठीही भरतीही करण्यात येणार आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पावर बसपाचा तीव्र आक्षेप!

0
प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरेंची सरकार,अदानी समूहावर टीका
 
सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करू नका; सरकारला आवाहन


मुंबई,दिनांक ७ जुलै २०२५:-
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली सरकार व अदानी समूह धारावीतील गरिबांच्या हक्कांवर गदा आणत आहे.हा प्रकल्प सामान्य जनतेच्या हक्कांचे उल्लंघन असून, लोकशाही मूल्यांना आणि जनतेच्या आरोग्याला धक्का पोचवणारा आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ऍड.सुनील डोंगरे यांनी सोमवारी (ता.७) व्यक्त केली. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेतून ऍड.डोंगरे यांनी केंद्र, राज्य सरकारसह अदानी समुहाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.राज्य महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोनचे मुख्य प्रभारी आणि पुण्याचे माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.दरम्यान, बसपाच्या शिष्टमंडळाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर श्रीनिवास यांना निवेदन देत धारावीतील समस्यांबाबत अवगत करवले.प्रदेश सचिव नागसेन माला, इंजि.दादाराव उईके, ऍड. शिरसाठ, उत्तर भारतीय भाईचारा, पुणे अध्यक्ष अनिल त्रिपाठी यावेळी उपस्थित होते.

धारावीतून लोकांना जबरदस्तीने हटवून देवनार डम्पिंग ग्राऊंडजवळ पुनर्वसित करण्याचा घाट घातला जातोय.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार, डम्पिंग ग्राऊंडच्या जवळपास ५०० मीटर परिसरात कुठलेही बांधकाम कायदेशीरदृष्ट्याही चुकीचे आहे. अशा विषारी परिसरात घरे बांधून लोकांना स्थलांतरित करणे म्हणजे थेट त्यांच्या जिवाशी खेळ करण्यासारखे आहे, असे मत व्यक्त करीत ऍड.डोंगरे यांनी सरकारच्या हेतूंवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.धारावीच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जैवविविधतेचा विनाश करून या भागाचे ‘बीकेसी २’ करण्याचा व्यापारी हेतू आहे, असा आरोप त्यांनी केला.

अदानी समूह समाजसेवा नाही, तर व्यावसायिक उद्देशाने काम करतोय. धारावीतील लोकांनी वर्षानुवर्षे मुंबईच्या अर्थव्यवस्थेला पाठबळ दिले आहे. त्यांना घरे देणे सरकारचे उपकार नाही, तर सामाजिक व कायदेशीर जबाबदारी आहे,अशी स्पष्ट भूमिका बसपा ची असल्याचे ऍड.डोंगरे म्हणाले.

लघुउद्योगांचे काय?

प्रकल्पाच्या आराखड्यात फक्त घरांचे पुनर्वसन आहे, लघुउद्योगांचे नाही.धारावीतील हजारो लघुउद्योग, विशेषतः चामडा, वस्त्रनिर्मिती, अन्नप्रक्रिया, मातीशिल्प हे रोजगाराचे स्रोत आहेत.जर या उद्योगांचे पुनर्वसन नसेल, तर लोकांना नोकरीविना घरे देऊन आणखी गंभीर समस्या निर्माण होतील.प्रकल्पात पारदर्शकतेचा अभाव आहे.नागरिकांसह स्थानिक प्रतिनिधी, सामाजिक संस्थांना या प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.अपात्रतेची कारणे, आर्थिक व्यवहार, पुनर्वसन निकष सर्व काही गोंधळात आहे. हा ‘टॉप-डाऊन’ दृष्टिकोन लोकशाही विरोधात आहे,असा आरोप बसपाचा आहे.

सरकारी जमिनींच्या खासगीकरणाचा डाव-डॉ.चलवादी

धारावीतील ६०% हून अधिक जमीन सार्वजनिक मालकीची असून, ती खासगी कंपन्यांना विकणे म्हणजे जनतेच्या मालकीच्या संपत्तीचे खासगीकरण होय.धारावीतील सर्व रहिवाशांना पात्र ठरवून त्यांना त्यांच्या मूळ जागीच घरे देण्यात यावीत.सरकारने कुठल्याही सवलतीच्या नावाखाली वंचितांची थट्टा करू नये.बसपा ही नेहमीच शोषित, वंचित, कष्टकरी वर्गाच्या बाजूने उभी राहिल आणि त्यांच्या हक्कांसाठी झगडत राहील, असे प्रतिपादन प्रदेश महासचिव डॉ.हुलगेश चलवादी यांनी केले.

कवलेवाडा येथे घराचे छत कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली

0

गोंदिया, दि. ७ : तिरोडा तालुक्यातील मौजा-कवलेवाडा येथे आज दुपारी १२ वाजता झालेल्या दुर्घटनेत एक घराचे छत कोसळल्याची घटना घडली. बुधाराम दूधबरैया यांचे राहते घर पावसामुळे कमकुवत झाले होते. परिणामी, आज अचानक घराचे छत पूर्णतः कोसळले.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.सततच्या पावसामुळे गावातील इतर घरांनाही धोका निर्माण होऊ शकतो, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.

आझाद हिंद एक्सप्रेसच्या चाकातून निघाला धूर; प्रवाशांत तारांबळ

0

गोंदिया : रायपूरकडून – नागपूरकडे जाणाऱ्या आझाद हिंद रेल्वेगाडीच्या चाकातून अचानक धूर निघू लागले. ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच एकच तारांबळ उडाली. त्याचबरोबर गंगाझरी रेल्वे स्टेशन जवळ असल्याने यंत्रणाही सतर्क झाली. आझाद हिंद एक्स्रपेसला गंगाझरीत थांबविण्यात आली. दरम्यान गाडीबाहेर पडण्यासाठी प्रवाशांमध्ये एकच धावपळ सुटली. यांत्रिकी विभागाने धूर निघत असलेल्या गाडीची पाहणी केली असता ब्रेक लाईनच्या घसरणामुळे धुर निघत असल्याचे समोर आले. यामुळे काही काळ थांबलेला प्रवास पुन्हा सुरू झाला. ही घटना (ता. ६) दुपारी ३ ते ४ वाजता सुमारासची आहे.
गाडी क्र. १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस नेहमीप्रमाणे गोंदिया रेल्वे स्थानकावर पोहोचली. ठराविक वेळेनुसार नागपूरच्या प्रवासासाठी फलाट क्र. ३ वरून रवाना झाली. अवघ्या १५ किमी अंतराचा प्रवास दरम्यान धावत्या रेल्वेगाडीच्या चाकातून धुर निघताना दिसून आले. ही बाब काही प्रवाशांच्या निदर्शनास आली. धुर वाढत चालल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. याची माहिती प्रवाशांकडून रेल्वे गार्ड व पायलट देण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही अंतरावर असलेल्या गंगाझरी रेल्वे स्थानकाला याची माहिती देवून सतर्क राहण्याच्या सुचना
देण्यात आल्या. रेल्वेगाडी पोहोचताच रेल्वे प्रशासन स्थानकावर सज्ज झाले. तर दुसरीकडे रेल्वेगाडीतून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांची मोठी घाईगर्दी दिसून आली. पाहता-पाहता आझाद हिंद एक्सप्रेसने प्रवास करणारे सर्व प्रवासी बाहेर पडले. त्यातच रेल्वे प्रशासनाने देखील धुर निघत असलेल्या डब्ब्यांची तपासणी करणे सुरू केले. दरम्यान एका डब्ब्याच्या ब्रेक लाईनरमधून होत असलेले घर्षनामुळे धूर निघत असल्याचे समोर आले. यामुळे रेल्वे प्रशासनासह प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. तुर्त यांत्रिकी विभागाच्या माध्यमातून समस्या मार्गी लावण्यात आली. यानंतर आझाद हिंद एक्सप्रेसचा पुढील प्रवास सुरळीत झाला. जवळपास २० ते २५ मिनिटे रेल्वेगाडीतून निघत असलेला धूर आणि भितीपूर्ण वातावरणातून निर्माण झालेला थरार सर्वांनी अनुभवला.

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा: धान खरेदीचे उद्दिष्ट २० लाख क्विंटलने वाढवले

0

आता २० जुलै पर्यंत होणार धान खरेदी!!

आमदार राजकुमार बडोले,विनोद अग्रवाल,विजय रहागंडाले व परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्याकडे केली होती मागणी

गोंदिया दि. ७ जुलै २०२५: गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उद्दिष्टा अभावी रखडलेल्या धान खरेदीच्या समस्यांकडे लक्ष वेधणाऱ्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले तसेच आमदार विजय रहागंडाले,विनोद अग्रवाल,परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदनातून केलेल्या मागणीला यश आले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशन २०२५ मध्ये आमदार बडोले यांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्याला व इतर आमदारांच्या निवेदनाला प्रतिसाद देत राज्य सरकारने धान खरेदीचे उद्दिष्ट २० लाख क्विंटलने वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोबतच धान खरेदी तातडीने सुरू करण्यात यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हो खरेदी २० जुलै २०२५ पर्यंत सुरू राहील.

आ. बडोले यांनी २ जुलै २०२५ रोजी विधानसभेत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या होत्या. यावर्षी उन्हाळी धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले असताना खरेदी प्रक्रिया अर्धवट थांबवल्याने शेतकऱ्यांचे धान शिल्लक राहिले होते. यामुळे धान खराब होण्याची भीती आणि आर्थिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत होता. त्यांनी धान खरेदीची मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती. https://www.berartimes.com/vidarbha/212381/ धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून तत्काळ चुकारे द्या – आमदार विजय रहांगडाले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शेतकऱ्यांना आशेचा किरण
गोंदिया आणि भंडारा हे धान उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हे असून, येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न प्रामुख्याने धान पिकावर अवलंबून आहे. धान खरेदीची मर्यादा वाढवण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. “हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. यामुळे पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना स्थैर्य मिळेल,” असे आ. बडोले यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल गोंदिया जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांनी सरकार आणि आमदार विनोद अग्रवाल यांचे आभार मानले आहेत.

मनसे व शिवसेना(उबाठा)ने हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्याबद्दल केला आनंदोस्तव

0

गोंदिया,दि.०७ः राज्यसरकारने लागू केलेला पहिलापासूनचा हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्याने मराठी भाषेचा विजय मनसेचा व शिवसेना (उबाठा)चा कार्यकर्त्यांनी मनोहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर एकत्र येत मिठाई वाटून आनंदोस्तव साजरा केला.इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले.

एकीकडे नुकतंच मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा देण्यात आला, आणि त्या पाठोपाठ काही प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या हिंदी ची सक्ती करणे म्हणजे भाषेचे महत्व कमी करण्याच्या प्रयत्न सरकारचा चालला होता. याचा प्रखर विरोध करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला, तसा पाठपुरावा सरकारकडे करण्यात आला.यावेळी मोर्चा काढण्याचे ठरविल्यानंतर अनेक राजकीय पक्ष संघटनांनी याला पाठिंबा देत मोर्चात सहभागी होण्याची तयारी दाखवली.सरकारने याच मोर्चाचा धसका घेत हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आणि शिवसेना उबाठा तर्फे मराठी जनतेचे अभिनंदन करण्यात आले. मराठीचा विजय झाल्याचा जल्लोष मनसे तर्फे मनोहर चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच फटाक्यांची आतिषबाजी व मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, गोंदिया शहर अध्यक्ष सुरेश (नानु) चौधरी, शिवसेना(उबाठा) शहर प्रमुख राजेश कनोजिया, मनसेचे माजी शहर संघठक क्षितिज वैद्य, शहर उपाध्यक्ष सुमित कावळे, शहर उपाध्यक्ष डिलेश उईके, शहर सचिव माधव बनकर, शाखा अध्यक्ष कार्तिक राऊत, विशाल ढेबे व तसेच शिवसेनेचे युवासेना उपजिल्हाधिकारी विक्की बोमचरे, शहराधिकारी शुभम सहारे, संघटक मुकेश दहीकर, अशोक लंजे, संतोष सहारे प्रामुख्याने मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक व शिवसैनिक उपस्थित होते.

धावत्या दुचाकीवर झाड पडल्याने वडीलाचा मृत्यू तर मुलगा जखमी

0

तिरोडा,दि.०७ः तालुक्यातील सतोना बोपेसर मार्गावर आज सकाळी ७ जुर्ले रोजी सकाळच्या सुमारास झाडावर वीज पडल्याने धावक्या दुचाकीवर झाड पडल्याने दुचाकीवरील वडीलाचा मृत्यू तर मागे बसलेला शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.जीवचंद यादोराव बिसेन (४६) असे मृतकाचे तर चिराग जीवचंद बिसेन (१६) असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे.
जीवचंद बिसेन हे वडेगाव येथील रहिवासी असून मुलगा चिराग यास शाळेत सोडण्यासाठी दुचाकी क्रमांक एमएच ३५ एपी ९३७० ने तिरोडा कडे जात होते.यावेळी अचानक सातोना -बोपेसर गावाजवळ रस्त्याच्या कडेवरील करंजी या झाडावर वीज कोसळल्याने झाड रस्त्याववर धावत असलेल्या दुचाकीवर कोसळला.या झाडाखाली दबल्याे जीवचंद बिसेन यांचा जागीच मृत्यू झाला तर चिराग हा गंभीर जखमी झाला.जखमी मुलावर गोंदिया येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

अलिबागजवळील समुद्रात संशयास्पद बोट?पोलीस यंत्रणा अलर्ट

0

ठिकठिकाणी नाकाबंदी; झाडाझडती सुरू

रायगड:-रायगडमधील अलिबागजवळच्या कोरलई समुद्रात संशयास्पद बोट आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकाराने जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या असून ठिकठिकाणी नाकाबंदी आणि झाडाझडती सुरु करण्यात आली आहे. बोटीमधून काही लोक उतरल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगडच्या मुरूड तालुक्यातील कोरलई इथं खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली. यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे. ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या बोटीतून काही व्यक्ती उतरल्याचा संशय असून पोलिसांनी रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे.रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. रायगड पोलीस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, शीघ्र प्रतिसाद दल, स्थानिक गुन्हे शाखा, नौदल, बाँब शोधक आणि नाशक पथक अशा सर्व यंत्रणा पोहोचल्या. संशयास्पद ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली.

कोरलईच्या लाईट हाऊसपासून साधारण दोन नोटिकल मैल अंतरावर ही बोट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या सर्व घटने बाबत पोलिस यंत्रणा काहीही बोलायला तयार नाही. जिल्हा प्रशासन देखील चुप्पी साधून आहे. दरम्यान, स्थानिक मच्छिमारांना घेऊन पोलिसांनी समुद्रात रात्री उशीरा पर्यंत कॉम्बिग ऑपेरेशन केले. समुद्रात काही अंतरावर बोटीवरील दिवे दिसून आले. परंतु बोटीच्या जवळ जाण्याच्या प्रयत्न केला त्यानंतर मात्र बोट समुद्रावर दुरपर्यंत दिसून आली नाही. पहाटे चारपर्यंत यंत्रणा शोध घेत होती, सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.

जगाला शांती, करुणा व अहिंसेची शिकवण देणारे शांतिदूत दलाई लामा

0

अर्जुनी मोरगाव -जगातील समस्त मानवसमूहाला शांती, करुणा व अहिंसेचा उपदेश देणारे तिबेटियन धम्मगुरु दलाई लामा हेच खरे सत्य योद्धा आहेत. हिंसात्मक मार्गाला थारा न देता, स्वतःची धर्म संस्कृती कायम ठेवून अहिंसात्मक मार्गाने तिबेटियन बांधवांच्या अधिकारासाठी सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यांची करुणामय शिकवणूक हीच मानवाच्या कल्याणासाठी निश्चितच सार्थकी ठरणारी आहे. तिबेटियन बांधवांविषयी आम्हाला सहानुभूती आहे.
सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवून शांती, करुणा व अहिंसेचा मूलमंत्र देणारे दलाई लामा शांतिदूत आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी केले.
तालुक्यातील तिबेटियन वसाहतमधील तिबेट बांधवांच्या वतीने गोठणगाव स्थित संबोता तिबेटियन स्कूल येथे आयोजित तिबेटियन धम्मगुरू दलाई लामा यांच्या ९० व्या जन्मदिन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून परिविक्षाधीन आयएएस अधिकारी साई किरण, उपविभागीय अधिकारी वरुण शहारे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, तिबेट भारत मैत्री संघ भंडाराचे अमृत बनसोड, पोलिस उपनिरीक्षक घनश्याम रोहनकर, शुभम नवले उपस्थित होते. दलाई लामा यांच्या ९० व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी नायर यांच्या हस्ते केक कापून जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.