37.1 C
Gondiā
Saturday, May 18, 2024
Home Blog Page 5

बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा, ग्रामीण रुग्णालयाची वसाहत ठरली शोभेची वास्तू !

0

गोंदिया,दि.१४ मेः- जिल्ह्यातील गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात कार्यरत अधिकारी, कर्मचार्‍यांना मुख्यालयी राहून सेवा देता यावी म्हणून रुग्णालय परिसरातच सदनिकेची निर्मीती करण्यात आली. मात्र, बांधकाम विभागाने आराखड्यानुसार बांधकाम केले असले तरी काही असुविधांचा ‘बट’ सदनिकेला लागल्याने सात वर्षानंतरही सदनिका रुग्णालय प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यात बांधकाम विभागाला यश आले नाही.
गोरेगाव येथील प्राथमीक आरोग्य केंद्राचे 2005 मध्ये ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यात आले. 2012 मध्ये ग्रामीण रुग्णालय इमारतीची निर्मीती झाली. मात्र अधिकारी, कर्मचार्‍यांच्या निवासस्थानाचा प्रश्न कायम राहिला. यानंतर अधिकार्‍यांसाठी 2 स्वतंत्र व कर्मचार्‍यांसाठी टाईप 1, 2, 3 या इमारतीच्या निर्मीतीला मंजूरी मिळाल्यानंतर 2013 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने सदनिकांच्या बांधकामाला सुरुवात केली. बांधकाम 2017 मध्ये पूर्णत्वास आले. चार वर्ष बांधकाम करूनही सदनिकांत आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या नाही. विशेष म्हणजे येथे पाण्याची सोयच करण्यात आली नाही. अधिकार्‍यांच्या पाहणीत काही उणिवा दिसल्या. परिणामी रुग्णालय प्रशासनाने वसाहत हस्तांतरीत करण्यास नकार दिला. जुलै 2017 मध्ये बांधकाम विभागाच्या चमूने पाहणी केली. बांधकामाच्या आराखड्यानुसार काम झाले किंवा नाही याची विचारणा करून ईस्टिमेटची मागणी रुग्णालय प्रशासनाने केली होती. सुविधांच्या पुर्ततेला घेवून अनेकदा रुग्णालयाने पत्र व्यवहार केला. मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले. वसाहत भग्नावस्थे आहे. येथे असामाजिक तत्वांचा शिरकाव पहावयास मिळतो. वरिष्ठांनी लक्ष देवून प्रश्न त्वरीत मार्गी लावावा, अशी मागणी आहे.

उद्घाटनापुर्वीच सदनिकेची दैनावस्था झाल्याचे चित्र आहे. सदनिकेत कामे शिल्लक असल्याचे दाखवून जिल्हा नियोजन विभागाने निधीची मागणी केली, निधी मंजूरही झाला. आता आचारसंहितेचे कारण पुढे करुन सदनिकेच्या शिल्लक कामांना पुर्ण करण्याकरीता बांधकाम विभाग टाळाटाळ करीत असल्याचे बोलले जाते. परिणामी रुग्णालयात कार्यरत अधिकारी, कर्मचार्‍यांना इतरत्र वास्तव्य करून सेवा द्यावी लागत आहे.

रुग्णालयाच्या वसाहतील शिल्लक कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मंजूर झाला आहे. आचार संहिता संपताच उर्वरित बांधकामाला सुरवात करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता रविंद्र गायकवाड यांनी सांगितले.

उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटीलला दोन दिवसांची पोलीस कोठडी

0

चंद्रपूर : गेल्या सात दिवसांपासून फरार असलेले उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांना चलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने पाचगणी येथून ताब्यात घेतले. त्यांना चंद्रपुरात आणल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी पाटील यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता १६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

‘बियर शॉपी’च्या परवान्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणातील इतर आरोपी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना सोमवारी जामीन देण्यात आला, मात्र पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. यानंतर ‘एसीबी’ने तपासाला गती दिली. सुरुवातीला कोल्हापुरातील एक अज्ञातस्थळी लपून बसलेल्या पाटील यांनी तीन-चार दिवसांपूर्वीच सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणी येथे मुक्काम हलवला होता. याची माहिती मिळताच ‘एसीबी’ पथकाने पाटील यांना पाचगणी येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना चंद्रपुरात आणण्यात आले व येथेच त्यांना अटक करण्यात आली.

अधीक्षक पाटील यांच्या संपर्कात असलेल्या चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी, कुटुंबीय व इतरांवर तसेच त्यांच्या भ्रमणध्वनीवर ‘एसीबी’चे विशेष लक्ष होते. त्याच माध्यमातून पाटील यांचा सुगावा लागला. मंगळवारी सायंकाळी पाटील यांना जिल्हा न्यायाधीश एक तथा अति. सत्र न्यायाधीश प्रशांत काळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील व पाटील यांच्या वकिलांनी युक्तीवाद केला. न्यायाधीश काळे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून पाटील यांची १६ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. आता पाटील यांच्या संपूर्ण संपत्तीची चौकशी होणार असल्याची माहिती आहे.

उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूरचे दुय्यम निरीक्षक खारोडे व कार्यालय अधीक्षक खताळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. दोन्ही अधिकारी ४८ तासांपेक्षा अधीक काळ पोलीस कोठडीत होते. यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पाटील यांना अटक झाल्याने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

चिंगी बीट मध्ये आढळले वेदर WxR 301D उपकरण

0

अर्जुनी मोरगाव,दि.१४ : नवेगाव बांध वनपरिक्षेत्रांतर्गत चिंगी बीट क्रमांक एक मधील कक्ष क्रमांक २१३ मध्ये शुक्रवारी (१०) एक इलेक्ट्रॉनिक्स उपकरण आढळून आले. या उपकरणामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.हे उपकरण हवामान खात्याचे असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आल्यानंतर जनतेच्या मनातली भीती दूर झाली आहे.

हवामानाचा अंदाज व वातावरणाचे निरीक्षण करणारे उपकरण हवामान विभागाद्वारे आकाशात सोडले जातात. वातावरणातील परिस्थितीचा अंदाज वर्तविण्याकरिता हे उपकरण सोडले जात असल्याचे समजते. यावरून हवामानाचा अंदाज निश्चित केला जातो. चिंगी बीटात वनरक्षक दुलिचंद सूर्यवंशी हे जंगलाची पाहणी करत असताना त्यांना अज्ञात वस्तू पडलेली दिसली. त्यांनी लगेच याची माहिती वन विभागाला दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. त्यांना हे उपकरण हवामान विभागाचे असल्याचे लक्षात आले.वन विभागाने हे उपकरण आपल्या ताब्यात घेतले आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वातावरणातील हवामानाचा अंदाज घेतला जातो. वातावरणाची परिस्थिती अशा उपकरणांद्वारे संकलित करून ती हवामान विभाग मार्फत लोकांपर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी अवकाशात सोडलेले असले उपकरण हे महत्त्वाची भूमिका बजावतात. चिंगी येथे सापडलेल्या या उपकरणावर वेदर WxR 301D असे लिहिले असून हे हवामान खात्याशी संबंधित असल्याचे समजते.उपकरण सापडल्याची खातरजमा प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी अवगान यांनी दिली.

टेलरिंगचा व्यवसाय अडचणीत….

0

गोंदिया,दि.१४ः एकेकाळी शिवणकाम करण्यासाठी टेलरिंगच्या व्यवसायाकडे युवकांचा कल होता. तो आता बोटावर मोजता येईल इतपत कमी झाला आहे. नव्हे या व्यवसायापासून युवा पिढी दूर जात असल्याचे चित्र आहे.रेडिमेड, ऑनलाइन कपडे घरपोच सेवा, शिवणकाम दरवाढ अशा अनेक कारणांमुळे शिवणकाम करणारा टेलरिंगचा व्यवसाय अडचणीत आला आहे. ग्रामीण ते शहरी भागात एकेकाळी नावाजलेले शिवणकाम करणारे टेलर्स म्हणून चर्चेत गणले जात होते. त्या चर्चा आता कालबाह्य होत आहेत. जुन्या पिढीतील टेलर्स पडद्याआड गेले आहेत. 10 वर्षांपूर्वी युवा पिढीतील टेलर्स निर्माण झाले.

गावात शिवणकाम करणार्‍या जुन्या पिढीतील टेलरच्या हाताखाली विनामोबदला शिवणकाम करण्याचे प्रशिक्षण घेतले जात असे. काच बटन सुरुवातीपासून, लावण्याच्या तर कापड कापण्यापर्यंत असे हे प्रशिक्षण होते. नंतर प्रशिक्षण घेतल्यानंतर युवा पिढीतील तरुणांनी स्वतःचे दुकान थाटले. ही पिढी आता प्रशिक्षण घेणारी अखेरची पिढी असल्याची दिसून येत आहे. सुरुवातीला भरभराटीला आलेला हा व्यवसाय ऑनलाइन व रेडिमेडकापड आल्याने अडचणीत आले आहे. लहानापासून वयोवृद्धांपर्यंत कपडे शिवले जात होते. बहुतांश आता रेडिमेड कापडाची मागणी वाढली आहे.Tailoring कापड शिवणकाम करण्यासाठी लागणार्‍या साहित्यात दरवाढ झाली, शिवणकामचे दर वाढले, स्वस्त दरात कापड उपलब्ध होत असल्याने ऑनलाइन व रेडिमेड कापडाचे मागणीकडे कल वाढला आहे.

राज्य सरकार कलावंत, वृद्ध व अन्य गरजवंताना मासिक मानधन देत आहे. परंतु, टेलर्सचा कधी विचारच करीत नाही. टेलर्सना मासिक मानधन लागू केले पाहिजे. उतार वयात मोठा आधार मिळेल.-हिरालाल गणवीर,टेलर्स, बाराभाटी

जितेंद्रनाथ महाराजांना पितृशोक ! श्रद्धेय दत्तात्रय लोमटे यांचे देहावसान

0

अमरावती : अंजनगाव सुर्जीचे श्रीनाथ पीठाधीश्वर परमपूजनीय आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांचे पिताश्री देवनाथ परंपरेतील ज्येष्ठतम नाथभक्त विद्वतवरेण्य दत्तात्रय केशव लोमटे यांचे आज वृद्धापकाळाने अमरावती येथे निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. शासकीय सेवेतून निवृत्त झालेले दत्तोपंत हे मूळ बडनेरा येथील असून त्यांचे पश्चात पत्नी सौ कुसुम, मुकुंद , माधव , मोहन ही मुले तसेच कुलकर्णी , प्रचंड, मंजू कुऱ्हेकर या मुली तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे. अंजनगाव सुर्जीचे पूर्व पीठाधिपती सदगुरु मनोहरनाथ महाराज यांचे अनुग्रहित असलेल्या दत्तोपंत लोमटे यांना त्यांच्या निःस्पृह नाथसेवेबद्दल ज्योतिषपीठ बद्रीकाश्रमचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्याकडून विद्वतवरेण्य हि उपाधी प्राप्त झाली होती. दत्तोपंत लोमटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्या पिढीतील स्वयंसेवक होते त्यांनी संघ संस्थापक डॉ हेडगेवार यांच्यासह रेल्वे प्रवास देखील केला होता. बंगालच्या शांतिनिकेतन मध्ये असताना त्यांना रवींद्रनाथ ठाकूर यांचादेखील सहवास लाभला. मधुराद्वैत संप्रदायाचार्य ज्ञानेश्वरकन्या गुलाबराव महाराज यांचे शिष्य बाबाजी महाराज पंडीत आणि श्री भाऊजी गिरणीकर यांनी दत्तात्रय लोमटे यांना ज्ञानेश्वरी पारायण व्रत सुपूर्द केले. दत्तात्रय लोमटे यांची निस्सीम भक्ती पाहून गोविंदनाथ महाराजांनी उत्सव साजरा करण्याचा संकेत दिला. नाथांचा संकेत ही आज्ञा मानून दत्तोपंत लोमटे यांनी १९५१ पासून ज्ञानेश्वरी पारायण आरंभिले आणि गोविंदनाथ महाराज यांचे आज्ञेनुसार स्वतःचे घरीच माऊलींचा संजीवन समाधी पुण्यतिथी उत्सव प्रारंभ केला. अगदी ७-८ व्यक्तीच्या उपस्थितीत प्रारंभ झालेला हा उत्सव आज लोमटे परिवाराची चौथी पिढी असंख्य नाथभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरी करते. आध्यत्मिक अधिष्ठान लाभलेले दत्तात्रय लोमटे यांनी आपले गुरुवर्य सद्गुरू मनोहरनाथ महाराज यांचे जीवनचरित्र सांगणारा श्रीमनोहरभक्तीरसामृत या नावाचा ओवीबद्ध पारायणग्रंथ रचला आहे. दत्तोपंतांच्या निधनावर ज्योतिषपीठ शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलताई मेढे ,विश्व हिंदू परिषदेचे प्रशांत हरताळकर, विश्वमांगल्य सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखा खंडेलवाल , भारतीय शिक्षण मंडळाचे डॉ नितेश सिंह , श्रीनाथ सखा साधक वृंद, जगद्गुरू देवनाथ वैदिक विज्ञान व अनुसंधान संस्था आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. देवनाथ मठ परिवारात चालता बोलता विश्वकोश असलेल्या स्व दत्तोपंताच्या पार्थिवावर अमरावती येथील हिंदू स्मशानभूमीत बुधवार १५ मे रोजी अंत्यसंस्कार केले जातील. अंतिमयात्रा सकाळी १० वाजता त्यांच्या दस्तूर नगर येथील निवासस्थानातून निघेल.

ताइक्वांडो खेल लड़कियों के स्व-संरक्षण के लिए उपयुक्त- पुलिस उपअधीक्षक बनकर

0

ग्रीष्मकालीन ताइक्वांडो प्रशिक्षण शिविर का समापन
गोंदिया: डीजीएम ताइक्वांडो स्पोर्ट्स एजुकेशन एंड यूथ अकादमी एवं गोंदिया जिला ताइक्वांडो एसोसिएशनके संयुक्त विद्यमान से दिनांक 1 से 10 मई इस दरम्यान औद्योगिक प्रशिक्षण संस्था फूलचूलपेठ, गोंदिया में ग्रीष्मकालीन ताइक्वांडो प्रशिक्षण शिविर का समापन 13 मई को किया गया।शिविर समापन कार्यक्रम के प्रमुख अतिथि के तौर पर पुलिस उप-अधीक्षक रोहिणी बनकर प्रमुख रूप से उपस्थित थे। उसी प्रकार जिला व्यवसाय शिक्षण अधिकारी हेमंत आवारे, उपकार्यकारी अभियंता शिखा पीपलेवर, उपप्राचार्य अविनाश केने,गोंदिया जिला ताइक्वांडो असोसिएशन के सचिव तथा मुख्यप्रशिक्षक दुलीचंद मेश्राम इत्यादि मान्यवर प्रमुख रूप से उपस्थित थे।उपस्थित सभी खिलाड़ी एवं पालक वर्ग को पुलिस उप-अधीक्षक रोहिणी बनकर अपने संबोधन में कहा कि ताइक्वांडो खेल लड़कियों के स्वसंरक्षण के लिए उपयुक्त है। एवं सरकारी- नीम्म सरकारी नौकरी भर्ती प्रक्रिया में इस खेल का आरक्षण में समावेश होने के कारण इसका फायदा गोंदिया जिले के खिलाड़ीयोने लेना चाइए। एवं गोंदिया जिले से राष्ट्रीय तथा अंतरराष्ट्रीय खिलाड़ी निर्माण हो ऐसा संबोधन किया। कार्यक्रम में ताइक्वांडो खिलाड़ियों ने उपस्थित सभी के सामने ताइक्वांडो प्रात्यक्षित एवं ताइक्वांडो फाइट करके नए खिलाड़ियों को प्रोत्साहित किया गया। इस प्रशिक्षण शिविर में 100 से अधिक खिलाड़ियों ने भाग लिया। कार्यक्रम का प्रस्ताविक सचिव दुलीचंद मेश्राम इन्होंने किया संचालन नरेश बोहरे इन्होंने किया एवं आभार प्रदर्शन उप प्राचार्य अविनाश केने इन्होंने किया।इस प्रशिक्षण शिविर में सह प्रशिक्षक कूंजन डोये, प्राची मौदेकर, कुसुम पटले, पूर्वा भंडारकर, आंचल राऊत, प्रथम भंडारकर,शिवम सोलंके, वैदेही शहारे, माधुरी थेर, शिमरान बनोटे, लावण्या पुसाम इन्होंने कार्यक्रम यशस्वी करने में सह कार्य किया।

सडक अर्जुनी नगराध्यक्ष मडावी,प्र.मुख्याधिकारी हलमारेसह इतर ४ जण लाच घेताना जाळ्यात

0

बांधकाम सभापती अंबादेसह नगरसेवक रंगारीसह इतर दोघेही जाळ्यात

गोंदिया दि.१४: सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या वैशिष्ट्य पुर्ण कामासाठी विशेष अनुदानातून तयार करण्यात आलेल्या बांधकामाच्या निविदेच्या रक्कमेवर १५ टक्के कमीशनची मागणी करुन त्या १५ टक्के कमीशनची रक्कम स्विकारल्याने जिल्ह्यातील सडक अर्जुनी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तेजराम मडावीसह,नायब तहसिलदार व प्रभारी मुख्याधिकारी शरद हलमारे,बांधकाम सभापती अश्लेष अंबादे,नगरसेवक महेंद्र रंगारी व नगरसेविकेचे पती खासगी ईसम जुबेर अलीम शेख @ राजू शेख व खासगी इसम शुभम रामकृष्ण येरणे यांना १ लाख ८२ हजाराची लाच घेतल्याप्ररकरणात एसीबीने आज(दि.१४)सापळा रचून अटक केली.

सविस्तर असे की,तक्रारदाराचा मुलगा कंत्राटदार असून सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या वैशिष्ट्य पुर्ण कामासाठी विशेष अनुदान सन 2023-24 लेखाशिर्ष (2217 1301) या योजने अंतर्गत दोन नाली बांधकामाच्या ई निविदा मंजूर झाल्या होत्या.त्या कामाच्या निविदेपोटी तक्रारदार यांनी सुरक्षा रक्कम भरली.व कार्यारंभ आदेश मिळण्याकरीता तक्रारदाराने मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांची भेट घेतली असता नगराध्यक्ष तेजराम मडावी यांनी निविदा रकमेच्या १५% रक्कम लाचेची मागणी केली.मात्र तक्रारदारास लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार(दि.१३) केली होती.
त्या तक्रारीच्या अनुषंगाने लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदाराने कार्यारंभ आदेश मिळण्याकरीता मुख्याधिकारी यांची भेट घेतली.त्यावर प्रभारी मुख्याधिकारी हलमारे यांनी नगराध्यक्ष मडावी यांची भेट घेण्यास सांगितले.त्यामुळे तक्रारदाराने नगराध्यक्ष यांची भेट घेतली असता लोकसेवक असलेले नगराध्यक्ष तेजराम मडावी यांनी निविदा रक्कम रू १२,१५,६३४/-रक्कमेवर १५% टक्के प्रमाणे रू १,८२,०००/- लाच रकमेची पंचासमक्ष मागणी केली.तसेच मुख्याधिकारी,बांधकाम सभापती,नगरसेवक,नगरसेवक यांचे पती व एका खासगी इसमाने त्या लाचेच्या मागणीला प्रोत्साहन दिले.तसेच नगराध्यक्ष मडावी यांनी लाच रक्कम खासगी इसम असलेले शुभम रामकृष्ण येरणे यांच्या दुकानात देण्यास सांगितल्याने तक्रारदाराने खासगी इसम असलेले शुभम येरणे यांच्या दुकानात रक्कम दिली असता ती लाच रक्कम स्विकारल्याने लाचलुचपत विभागाने आरोपीस लाच रकमेसह ताब्यात घेतले.आरोपी क्रं, १,२,३,४ व ६ यांना ताब्यात घेण्यात आले असून पो. स्टे. डुग्गीपार येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

सदर कारवाई गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पर्यवेक्षक अधिकारी व पोलीस उप अधिक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अतुल तवाडे यांच्या नेतृत्वात सापळा रचण्यात आला.या सापळा कार्यवाही पथकात पो.नि. उमाकांत उगले.स.फौ.चंद्रकांत करपे,पो. हवा. संजयकुमार बोहरे,मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, मनापोशी संगीता पटले ,चालक नापोशि दिपक बाटबर्वे सहभागी झाले होते.

आपल्या संविधानिक आरक्षणासाठी संघटीत व्हा; माणिक गेडाम

0

अखिल ढिवर समाज विकास समितीची आरक्षण संवाद महासभा संपन्न

गोंदिया;- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मंत्र शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा या प्रमाणे ढिवर समाजाने आपल्या संविधानिक अुनसूचित जातीच्या आरक्षणासाठी संघटित व्हावे असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक, विचारवंत माणिक गेडाम यांनी केले. अखिल ढिवर समाज विकास समितीच्या वतीने दिनांक 12 मे 2024 रोजी इंद्रराज सभागृह सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे आरक्षण संवाद महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ साहित्यिक, विचारवंत माणिक गेडाम अध्यक्षस्थानी होते तर सह अध्यक्ष म्हणून प्रा. जनार्दन नागपूरे तसेच प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. योगेश दुधपचारे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रामकृष्ण शिंदे, डॉ. प्रकाश महालगावे, के. एन. नान्हे, दिनानाथ वाघमारे, डॉ. अविनाश नान्हे, प्रा. डॉ. दिशाताई गेडाम, प्रकाश पचारे, टेकचंद मारबते, गिरीधारी भोयर, अशोक शेंडे, ॲङ गौरी शेंडे उपस्थित होते.

माणिक गेडाम पूढे म्हणाले, ढिवर समाज सन 1936 ते 1950 पर्यंत अनुसूचित जातीत सामाविष्ठ असतांना आज तो स्वत:च्या संविधानिक आरक्षणापासुन वंचित आहे. हा समाज अनुसूचित जातीच्या यादीमध्ये कायम असता तर आज या समाजाची प्रगती होवू शकली असती परंतु या समाजाचे हे दुर्दैव आहे. म्हणून या समाजाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांची गरज असुन त्यांना अपेक्षित असे संघटन आपल्याही समाजात व्हावे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

या सभेचे प्रास्ताविक समितीचे कोषाध्यक्ष डॉ. माधवन मानकर यांनी केले. तर प्रमुख मार्गदर्शन प्रा. डॉ. योगेश दुधपचारे यांनी आरक्षण म्हणजे काय?, आरक्षणाची गरज कशासाठी?, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व समाजाला संघटित होण्याचे आव्हान केले. भविष्यात महाआंदोलनाची दिशाही ठरवावी लागेल असेही संकेत त्यांनी यावेळी दिले. प्रा. जनार्दन नागपूरे यांनी समाजात काम करणाऱ्या संघटना संघर्ष वाहिनी, एकलव्य सेना या ही संघटनांनी या अखिल ढिवर समाज विकास समितीच्या महाआंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान केले. अखिल ढिवर समाज विकास समितीचे अध्यक्ष मनोज केवट यांनी आजपर्यंतचा राज्य व केंद्र सरकार सोबत केलेल्या पत्रव्यवहारासंबंधी माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त कार्तिकस्वामी मेश्राम यांनी ढिवर समाजाच्या या आरक्षणाच्या वंचितपणाचा अमृतकाळ सुरु असलेल्या वेदनेवर पोवाडा सादर करुन समाजाची वेदना मांडली. पवनी तालुका येथील  धनराजजी मेश्राम यांनी सामाजिक परिस्थितीवर गीत सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

तसेच भंडारा व गोदिंया जिल्हातील तालुकानिहाय प्रतिनिधी परेश दुरुगवार, राजु वलथरे, अर्जुन मेश्राम, सौ. प्रणिता मेश्राम, सुभाष उके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमांचे सुत्र संचालन विष्णु चाचेरे, लाखनी यांनी केले तर आभार केशव कोल्हे, अर्जुनी/मोरगांव यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुकरजी बावनउके, गोविंद मखरे, योगेंद्र दुधपचारे, दिगांबर चाचेरे, चर्तुभुज भानारकर, अमोल वलथरे, सुजाता मारबते, निशा मखरे, खेमु मेश्राम, राजेद्रं चापरे, संदिप मारबते, रुपेश भानारकर, किशोर शेंडे, श्रीकृष्ण शेंडे, राजन नवदेवे, लहु कांबळे, संतोष मेश्राम, अरुन नान्हे, मनिराम नान्हे, आशिष दिघोरे, लिलाधर शिवरकर, नंदू उके, कोमेश कांबळे, अक्षय वाघधरे, मनिराम मौजे, राजेश वलथरे, आशा दुधपचारे, अर्चना दुधपचारे, गणराज नान्हे, मनोज मेश्राम, होसलाल वलथरे, प्रयास मानकर, हेमंग मखरे, मंथन मखरे आदींनी सहकार्य केले. यावेळी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांना प्रथम प्राधान्य द्या, दिरंगाई निदर्शनास आल्यास कारवाई

0
मानसूनपूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचे निर्देश
वाशिम,दि.१४ मे -आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांना सर्व विभागांनी प्रथम प्राधान्य देणे अपेक्षित असून यासंदर्भात कोणत्याही प्रकारची दिरंगाई निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी आज जिल्हधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत दिल्या. या आढावा सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,राजेंद्र जाधव,  कैलास देवरे, सर्व तहसीलदार व जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते.तसेच यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राम लंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील धोकादायक इमारती व भिंती शोधुन त्या पाडाव्यात,होर्डिंग स्ट्रकचर सुस्थितीत असल्याचे नगर प्रशासनाने अहवाल सादर करावे,पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वचछ करून पाणी पुरवठा करणे तसेच ग्रामीण भागातील प्रकल्प, बंधारे, रस्ते आणि पुल हे सुस्थितीत असल्याचे सुनिश्चित करुन तसे लेखी कळविण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचित केले. विशेष करुन शाळा आणि महाविद्यालयांच्या इमारती व्यवस्थित असल्याची शिक्षण विभागाने खात्री करावी. खाजगी शाळांकडून शाळा व परिसर विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र घेण्याबाबतही शिक्षण विभागाने कार्यवाही करण्याचे आदेशित केले.
      मान्सून पूर्व तयारी म्हणून काय उपाय योजना व काय खबरदारी घ्यावी तसेच संभाव्य धोके निवारण करण्यासाठी काय काम केले आहे. केलेल्या कामाचा आणि सर्व विभागाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडयाचा मुद्दे निहाय आढावा घेत जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व विभागाचे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावे. सदर कक्ष २४ तास सुरू राहील याची दक्षता घ्यावी. याकरिता कर्मचारी यांची नियुक्ती करुन सर्व विभागाचे दूरध्वनी क्रमांक सुरू आहे किंवा नाही याची खात्री करावी. सदर दूरध्वनी क्रमांक नागरीकांमध्ये प्रसिद्ध करण्यात यावे.तसेच आपल्याकडे असलेले आपत्ती व्यवस्थापन साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करा.जिल्हा, तालुका व गावस्तरावरील सर्व कामे तातडीने गावातील व शहरातील नाल्या,नाले साफ सफाई, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, पुल, वाकलेले इलेक्ट्रिक पोल, तार, धोकादायक वाळलेली झाडे झुडपे काढणे, धोकादायक इमारती, शाळा, घरे, वेशी, पुल, रस्ते, धरण, गाव तलाव, पाझर तलाव, नाला खोलीकरण ही कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी.असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, की सर्व तहसील कार्यालयात तालुका स्तरावरील शोध व बचाव पथक गठित करण्यात यावे.नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे व उष्मालाट बाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनांतर्गत माहिती पत्रक तयार केले आहे याबाबत गावात व शहरात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. तसेच जिल्हा पुरवठा विभाग व आरोग्य विभाग यांनी नदीकाठच्या गावांना पुरेशा प्रमाणात अन्न धान्य साठा व औषध साठा ठेवण्यात यावा.पावसाळ्यात पूर परिस्थिती उद्भवल्यास नदी काठच्या गावांना दुसरे पर्यायी मार्ग आहे किंवा नाही याची तातडीने पाहणी करावी. शासकीय कार्यालय, इमारती, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालये इमारती मध्ये पाणी गळत असेल तर तातडीने दुरुस्ती करून घेण्यात यावी. पोलीस पथके, आरोग्य पथके, विज वितरण कंपनीचे पथके, अग्निशमन दलाचे पथके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथके, तहसील कार्यालयाचे पथके, कृषी विभागाचे पथके, परिवहन विभागाचे पथके, पंचायत विभागाचे, शिक्षण विभागाचे पथके, नगर परिषदचे पथके, पाणी पुरवठा विभागाचे पथके २४ तास मदत व सहकार्य करण्यासाठी तैनात राहतील याची दक्षता घ्यावी.असेही जिल्हाधिकारी यांनी आदेश संबंधित यंत्रणेला यावेळी दिले.