39.6 C
Gondiā
Sunday, May 11, 2025
Home Blog Page 5662

स्वबळावर लढण्यासाठी कामाला लागा !-प्रफुल्ल पटेल

0

अकोला : काँग्रेस पक्षाचा आतापयर्ंत कटू अनुभव लक्षात घेता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यानी आतापासूनच स्वबळावर कामाला लागावे, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी येथे केले. राष्ट्रवादी पक्षाचे जेवढे नुकसान काँग्रेसने केले, तेवढे कोणीही केले नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीची बदनामी करण्याची कोणतीच कसर सोडली नाही. ‘खुद तो डुबे सनम, हमको भी ले डुबे’ अशा पद्धतीची काँग्रेसची राकाँसोबत खेळी राहीली, असे टीकास्त्र प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसवर सोडले.
महेश भवनात खा. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. खा. पटेल म्हणाले की, काँग्रेसशिवाय दलित आणि अल्पसंख्याकांना दुसरा पर्याय नाही असा या पक्षाचा गैरसमज आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नाही. अल्पसंख्याकाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीने वेळप्रसंगी संघर्षही केला आहे. ही बाब सलत असल्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीचे नेहमीच पाय ओढले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असून कार्यकर्त्यांनी आतापासूनच 8कामाला लागावे.

युनिव्हर्सल कंपनी सुरु होणार -पटले

0

तुमसर : विद्युत दर कमी केल्याचे आदेश न मिळाल्याने युनिव्हर्सल फेरो ही कंपनी अजूनही सुरु झालेली नाही. याबाबत कंपनीला आदेश मिळताच ही कंपनी सुरु होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी दिली आहे.
युनिव्हर्सल फेरो येथील आंदोलनानंतर राज्यशासनाने २६ टक्के विद्युत दर कमी केले आहे. पंरत अजूनपर्यंत राज्याचे राज्यपाल यांच्या वतीने शासकीय आदेशावर स्वाक्षरी होवून आदेश प्रसारित झालेले नाही. त्यामुळे कंपनी सुरु होण्यास उशिर होत आहे. या मुदय़ावर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी कंपनीचे मालक नेंत्रावाला यांच्या मुख्य अधिकार्‍यांसोबत सकारात्मक चर्चाकेली या चर्चेत ही कंपनी सुरु करण्याचा अडचणींवर सविस्तर चर्चाकरण्यात आली. कंपनीमार्फत उद्योगमंत्र्यांना दिलेल्या पत्राचा व त्यातील अटींचा उल्लेख करण्यात आला. मात्र त्यावर कंपनी प्रशासनाने गांभीर्य दाखविले नाही. या मुद्यावर शिवसेनेचे वेळोवेळी सहकार्य करण्याचे वचन दिल्यानंतरही याकडे लक्ष देण्यात येत नाही.
ना. सुभाष देसाई यांनी शासन स्तरावर आक्रमक भुमिका घेवून विदर्भ मराठवाड्यात २६ टक्के विद्युत दर प्रति युनिट मागे कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासह अन्य विशेष सवलतीही देण्यात याव्या अशा निर्णय व त्यावर चर्चाकरण्यात आली होती. ७५ पैसे प्रति युनिट विद्युत बंद कारखाण्यासाठी मंजुर करवून घेतला. सध्या ७.४0 पैसे प्रति युनिट प्रमाणे दर कंपनीला लागू आहे. पंरतु २६ टक्के दर कमी झाल्यामुळे ५.४८ पैसे प्रति युनिट दर झाले आहे. त्यातून पुन्हा बंद पडलेल्या कारखान्यांसाठी ७५ पैसे कमी करण्यात येत असल्याने प्रति युनिट दर ४.७३ पैसे राहणार आहे.

भंडारा जिल्हा विज्युक्टा जिल्हा कार्यकारिणीची सभा उत्साहात

0

भंडारा,(११ )—स्थानिक जे.एम.पटेल काॅलेज येथे आज सकाळी साडे अकराच्या सुमारास भंडारा जिल्हा विज्युक्टा जिल्हा कार्यकारिणीची सभा उत्साहात पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी  विज्युक्टाचे जिल्हा अध्यक्ष प्रा.मार्तंड गायधने हे होते. केंद्रीय कार्यकारिणी सहसचिव प्रा.डाॅ ज्ञाननेश्वर गौपाले हेही प्रमुख्याने उपस्थित  होते.
शिक्षण आणि शिक्षकांचे प्रश्न सतत संघर्षरत राहुन सोडवणारी लढाऊ संघटना म्हणुन गेली ३३वर्षापासुन कार्यरत असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विज्युक्टा संघटनेचे राज्यस्तरीय महाअधिवेशन येत्या आॅक्टो-नोव्हेंबर मध्ये श्रीक्षेत्र शेगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे.  त्यासंदर्भात नियोजन वआढावा घेण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
संघटनेनी शिक्षणक्षेत्रातील अनेक समस्या सोडविल्या,आंदोलनाच्या माध्यमातून विविध शाशन आदेश काढुन घेतले. तरीही नवनवीन प्रश्नांसोबत काही महत्वाचे प्रश्न अजुनही प्रलंबित आहेत. दिवसागणिक निघणारे शासन आदेश हे शासनाची शिक्षण व शिक्षकांप्रती नकारात्मक भूमिका सिध्द करणारे आहेत. शिक्षणव्यवस्थेला उद्ध्वस्त करणारे हे धोरण हाणून पाडण्यासाठी तसेच शैक्षणिक हित जोपासण्यासाठी संघठित प्रयत्नांचा एक भाग म्हणून या अधिवेशनाची उत्स्फूर्त तयारी संघटनेच्या सभासदांनी चालवली आहे. या निमित्ताने संपूर्ण राज्यातील शिक्षकांची मांदियाळी श्रीक्षेत्र शेगाव येथे भरणार आहे. याविषयीची माहिती व जिल्ह्याचे नियोजन कसे असेल, यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हातील विवीध समस्यांवर एकत्रित चर्चा सुद्धा करण्यात आली
सभेचे संचालन जिल्हासचिव प्रा.राजेंद्र दोनाडकर यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा सहसचिव प्रा.एस आर सावरकर यांनी मानले.
यावेळी जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी प्रा.सावरकर,प्रा.मुदलियार,प्रा.चौधरी,प्रा.डी.लांजेवार,प्रा.पी के शिवणकर,प्रा.किरणापुरे,प्रा.सिंगनजुडे,प्रा.अशोक गायधने,प्रा.बन्सोड व तुमसर तालुका अध्यक्ष प्रा. डब्लु यु मोहतुरे,लाखनी ता.अध्यक्ष प्रा.उमेश सिंगनजुडे व सचिव प्रा.युवराज खोब्रागडे,प्रा ए ए पटले,भंडारा ता.अध्यक्ष प्रा.सुभाष गोंधुळे ,जि.का सदस्य प्रा.शिवशंकर कारेमोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नौगम सेक्टरमध्ये चकमकीत 4 दहशतवादी ठार

0
 वृत्तसंस्था

श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील नौगम सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळून लावत चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौगम सेक्टरमध्ये एलओसीवर सीमेपलिकडून भारतीय हद्दीत घुसखोरी होत असल्याच्या संशय आल्याने गोळीबार करण्यात आला. यावेळी दहशतवाद्यांकडूनही गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांना ठार केले.या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. परिसरात सुरक्षा रक्षकांकडून शोधमोहिम राबविण्यात येत आहे.

 

सालेकसा व देवरी तालुक्यात अतिवृष्टी

0

२४ तासात सरासरी २६ मि.मी.पाऊस
जिल्ह्यात सरासरी ८३७.६ मि.मी.पाऊस
गोंदिया,दि.११ : जिल्ह्यात १ जून ते ११ सप्टेबर २०१६ या कालावधीत २७६४०.९ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ८३७.६ मि.मी. इतकी आहे. आज ११ सप्टेबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ८५८.१ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी २६ मि.मी. इतकी आहे. आजपावेतो जिल्ह्यात ७१ टक्के पाऊस झाला आहे. देवरी तालुक्यात मुल्ला मंडळ विभागात १२ मि.मी., देवरी मंडळात ८० मि.मी., चिचगड मंडळात १०३ मि.मी. पाऊस पडला, असा एकूण देवरी तालुक्यात सरासरी ६५ मि.मी. पाऊस पडला. सालेकसा तालुक्यात कावराबांध मंडळ विभागात ५४ मि.मी., सालेकसा मंडळात ११४ मि.मी., साकरीटोला मंडळात ३३ मि.मी. पाऊस पडला, असा एकूण सालेकसा तालुक्यात सरासरी ६७ मि.मी. पाऊस पडल्याने अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे.
११ सप्टेबर रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- ३१ मि.मी. (४.४), गोरेगाव तालुका- १५.३ मि.मी. (५.१), तिरोडा तालुका- १११ मि.मी. (२२.२), अर्जुनी मोरगाव तालुका- १९५.२ मि.मी. (३९.०), देवरी तालुका- १९५ मि.मी. (६५.०), आमगाव तालुका- ५६.६ मि.मी. (१४.२), सालेकसा तालुका- २०१ मि.मी. (६७.०) आणि सडक अर्जुनी तालुका- ५३ (१७.७), असा एकूण ८५८.१ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी २६ मि.मी. इतकी आहे.

बोनससाठी आदिवासी मजूर झिजवितो वन विभागाचे उंबरठे

0

देवरी – सन २०१४ च्या हंगामातील तेंदूपाने तोडणाऱ्या मजुरांना मिळालेले बोनस आपल्यालाही मिळावे, म्हणून तालुक्यातील एक आदिवासी मजूर गेल्या सहा महिन्यापासून वनविभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. परंतु, चिचगड येथील वनाधिकारी हे त्याला बोनसची रक्कम न देता देवरीच्या बँकेत चकरा मारायला लावत आहेत. परिणामी, वनाधिकाऱ्यांच्या चुकांची शिक्षा एका गरीब आदिवासीला का? असा आर्त प्रश्न त्या आदिवासी मजुराने सरकारला केला आहे.

सविस्तर हकिगत अशी की, वनविभागाच्या चिचगड वन परिक्षेत्रांतर्गत कडीकसा बीटात २०१४ च्या हंगामात तेंदूपाने तोडण्यात आली होती. त्या कामाची प्रोत्साहन राशी मजुरांना वाटप करण्यासाठी मार्च २०१६ मध्ये चिचगड कार्यालयाला प्राप्त झाली. हे बोनस पाचशे रुपयांपेक्षा अधिक असल्याने सदरची रक्कम ही धनादेशाने देण्याचे शासनाचे नियम आहेत. त्यामुळे सर्व मजुरांकडून त्यांचे बँक खात्याचे विवरण घेण्यात आले. त्यानुसार, कडीकसा येथील रहिवासी मुरलीधर भोजराज भंडारी या मजुराने आपल्या महाराष्ट्र बँकेतील खात्याचा क्रमांक तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे दिला. त्या कर्मचाऱ्याने मुरलीधरचा महाराष्ट्र बॅेकेचा खाते क्रमांक चिचगड कार्यालयात बिनचुक दिला. परंतु, वनविभागातील लिपिकाने मुरलीधरच्या नावापुढे महाराष्ट्र बँकेचा उल्लेख न करता यादीत भारतीय स्टेट बँकेच्या देवरी शाखेचा उल्लेख केला. परिणामी, मुरलीधरच्या मजुरीचे २ हजार ६६७ एवढी रक्कम महाराष्ट्र बँकेऐवजी स्टेटबँक देवरीकडे गेली. यामुळे मुरलीधरला त्याच्या मजुरीचे पैसे मिळाले नाही. ते पैसे मिळावे म्हणून मुरलीधर हा चिचगडच्या वनविभागाचे गेल्या सहा महिन्यापासून चकरा मारत आहे. तेथील वरिष्ठ लिपिक आणि संगणक परिचालक देशमुख हे त्याला उडवाउडवीची उत्तरे देऊन हाकलून लावत असल्याचा आरोप मुरलीधर व त्याचे वडील भोजराज यांनी केला आहे. सदर मजुराला स्टेट बँकेत जाऊन पैसे घे,असे सांगत असल्याने मुरलीधर आपल्या वडिलांसह देवरीच्या स्टेट बँकेत चकरा मारत आहे. तेथे सुद्धा त्याला समाधान कारक उत्तर बँकेचे अधिकारी देत नसल्याचे भोजराज भंडारी यांनी सांगितले. अनेकवेळा अर्ज करा असे सांगून नंतर ते अर्जसुद्धा घेत नसून दिवसभर बँकेत बसवून ठेवत असल्याचे भंडारी यांचे म्हणणे आहे. बँकेने सुद्धा त्यांचेकडील रक्कम अद्यापही वनविभागाच्या कार्यालयाला परत केली नाही. त्यामुळे एका गरीब आदिवासी मजुराची मजुरी बुडणार तर नाही ना, या भीतीने भंडारी कुटुंबीय चिंतातूर आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन मजुरी मिळण्यास मदत करावी, अशी मागणी मुरलीधर व त्याचे वडील भोजराज भंडारी यांनी वनविभागाकडे केली आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी चिचगड येथील वनाधिकाऱ्यांसी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

कुरखेडाच्या सती नदीला पूर

0
 गडचिरोली,दि. ११ – जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कुरखेडाच्या सती नदीला पूर आला आहे. पुलावरून तीन फूट पाणी वाहत असल्याने कुरखेडा ते कोरची, धानोरा,मालेवाडा, वैरागड-गडचिरोली मार्ग बंद झाला आहे. कुरखेडाच्या वार्ड नं 15 मधील 30 घरात पुराचे पाणी घुसले आहे. कोरची-मालेवाडा मार्ग बंद भामरागडात पूर परिस्थिती बिकट, पर्लकोटा नदीला पूर आलापल्ली- भामरागड मार्ग बंद.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे ओबीसी प्रेम पुन्हा उफाळले

0

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून सहा टक्क्यावर करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील १२०० वर अधिक गावांंमध्ये पेसा कायदा लागू झाला आहे. यात अनेक गैरआदिवासी गावेही आहेत. या गावांना वगळावे आदी मागण्यांना घेऊन ओबीसी समाज २०१४ पासून प्रयत्नशील आहेत. भाजपने या प्रश्नावर अनेकदा आश्वासने दिली. परंतु एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. आगामी काळात नगर पालिका व पंचायत समिती, जिल्हा परिषद याच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे ओबीसी मतदारांचा प्रचंड रोष विद्यमान लोकप्रतिनिधींवर आहे. भारतीय जनता पक्षातीलही ओबीसी कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. केवळ अधेमध्ये ओबीसी शिष्टमंडळ मुंबईत नेऊन त्या नेत्यांचे मनोरंजन करण्याचे काम भाजप करीत आहे, असा आरोप आता प्रखरपणे होऊ लागला आहे.

यांचा रोष दाबण्यासाठी ९ सप्टेंबरला खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे यांच्या नेतृत्वात भाजपातील ओबीसी सदस्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. पुन्हा ओबीसींच्या प्रश्नाचा कोळसा उगाळण्यात आला व जुनेच आश्वासन देण्यात आले. या आश्वासनाची पूर्तता होण्याची शक्यता तीळमात्र नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या ओबीसींच्या प्रश्नावर विधानसभा निवडणुकीपासून आतापर्यंत भाजपच्या लोकप्रतिनिधींनी ओबीसी शिष्टमंडळासह दोन ते तीन वेळा राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कैफीयत मांडली होती. मात्र त्यानंतरही ओबीसींना न्याय मिळाला नाही. त्यामुळे ओबीसी जनतेचा आता पूरता विश्वास उडालेला आहे.

नागरिकांनी एलईडी लाईटचा वापर करावा- आ. रहांगडाले

0

तिरोडा , ता.11: आपणास औष्णिक उर्जा ही महाग पडत असून आवश्यकतेऐवढी आपण निर्माण करु शकत नाही. त्यामुळे प्रदूषणही भरपूर होतो. वीज वापरताना महाग पडत असून सौर ऊज्रेचा वापर केल्यास त्यातही एलईडीचा वापर केल्यास प्रकाश भरपूर मिळेल व बिलही भरावे लागणार नाही. नागरिकांनाही एलईडी लाईटच्या वापर करावा, असे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले.विरसी चौकातील हायमास्ट लाईटचे उद््घाटन करताना ते बोलत होते.
उद््घाटन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते, सरपंच पद्मा वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने पोलीस पाटील हेमंत नागपुरे, प्रमोद गौतम, प्रफुल टेंभरे, गोपीचंद बावणकर, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाने, गजानन फटिंग, बकाराम पटले उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, हे हायमास्ट लाईट आपल्या आमदार निधीतून लावले असून तिरोडा तालुक्यात आठ ठिकाणी लावण्यात आले आहेत. असा हा नाविण्यपूर्ण उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याच विधानसभा क्षेत्रात होत असल्याचे सांगितले. शाळेच्या आवार भिंतीसाठी पाच लाखांचा निधी मंजूर झाल्याचेही सांगितले.
शेतीसाठी पाणी महत्वाचे आहे. खळबंदा तलावात लवकरच पाणी सोडले जाईल तर चोरखमारा व बोदलकसा जलाशयात पाणी सोडण्याचे कार्य टप्पा-२ मध्ये होणार आहे. प्रकाशाच्या बाबतीत प्रथमत: गोला लाईट, ट्यूब लाईट, सीएफएल बल्व आणि आता एलईडी बल्ब आलेत. एलईडीमुळे विद्युत बचत होते. त्यामुळे नागरिकांनी एलईडीचा वापर करावा. शासनाचे पाऊलसुद्धा याकडे आहे, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक हंसराज रहांगडाले यांनी मांडले. संचालन नरेश रहांगडाले यांनी केले. आभार घनश्याम पटले यांनी मानले.

सुरेश कदम : गणेशोत्सव शांततेत साजरा करा

0

गोरेगाव , ता.11: तालुक्यातील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सभा नुकतीच पंचायत समिती सभागृहात पार पडली. या सभेद्वारे सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी केले.सभेला मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्यासह उपनिरीक्षक श्रीधर खडके, नरेंद्र भड, डिलेश्वर पंधरे उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील ५५ गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. ५ सप्टेंबरपासून स्थापित केलेल्या गणेशाचे विसर्जन १५ सप्टेंबरपर्यंत करावयाचे आहे. १० दिवस विराजमान गणेशोत्सवात शांतता राहावी म्हणून घ्यावयाच्या काळजीबाबत सुरेश कदम यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यावर्षी सहाय्यक धर्मादाय आयुक्तालय यांच्यामार्फत सर्व मंडळांनी तात्पुरत्या १० दिवसांची नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी झालेल्या मंडळांना परवानगी मिळेल. पण नोंदणी न झालेल्या मंडळांना स्वजबाबदारीवर गणेशोत्सव साजरा करावा लागेल. यासाठी रितसर सूचनांचे पालन करून गावातील शांतता भंग होणार नाही. लेखी परवानगी शिवाय वर्गणी गोळा करू नये व रहदारी अडवू नये, मंडप बांधण्यासाठी खासगी व ग्रामपंचायत जागेची लेखी परवानगी द्यावी. गणेश मूर्तीचे आसन मजबूत करावे. पावसापासून संरक्षण करावे, सजावटीमध्ये हॅलोजन व प्रखर उजेड देणारे विद्युत बल्व वापरु नये. उत्सवामध्ये व मिरवणुकीमध्ये करण्यात येणाऱ्या देखाव्याची माहिती पोलीस ठाण्याला देऊनच देखावे सादर करावे. जातीय भावना दु:खवतील असे आक्षेपार्ह गाणे, पोवाडे, पोस्टर्स लावू नये. मंडपाच्या ठिकाणी, विद्युत खांबावर धार्मिक किंवा संघटनेचे झेंडे लावू नये. मद्यपान करून झगडा- भांडण करणाऱ्या व्यक्तीस पोलिसाच्या स्वाधीन करावे. मिरवणुकीत गुलाल उडवू नये. मोठ्या आवाजाचे फटाके फोडू नये. मिरवणुकीच्या वेळी लहान मुलांना वाहनाच्या वरच्या भागावर बसवू नये, असे मार्गदर्शन केले.मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली नावे, मोबाईल क्रमांक देऊन पोलीस विभागाला वेळोवेळी सूचना द्यावे व कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे सांगितले.