बोनससाठी आदिवासी मजूर झिजवितो वन विभागाचे उंबरठे

0
16

देवरी – सन २०१४ च्या हंगामातील तेंदूपाने तोडणाऱ्या मजुरांना मिळालेले बोनस आपल्यालाही मिळावे, म्हणून तालुक्यातील एक आदिवासी मजूर गेल्या सहा महिन्यापासून वनविभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. परंतु, चिचगड येथील वनाधिकारी हे त्याला बोनसची रक्कम न देता देवरीच्या बँकेत चकरा मारायला लावत आहेत. परिणामी, वनाधिकाऱ्यांच्या चुकांची शिक्षा एका गरीब आदिवासीला का? असा आर्त प्रश्न त्या आदिवासी मजुराने सरकारला केला आहे.

सविस्तर हकिगत अशी की, वनविभागाच्या चिचगड वन परिक्षेत्रांतर्गत कडीकसा बीटात २०१४ च्या हंगामात तेंदूपाने तोडण्यात आली होती. त्या कामाची प्रोत्साहन राशी मजुरांना वाटप करण्यासाठी मार्च २०१६ मध्ये चिचगड कार्यालयाला प्राप्त झाली. हे बोनस पाचशे रुपयांपेक्षा अधिक असल्याने सदरची रक्कम ही धनादेशाने देण्याचे शासनाचे नियम आहेत. त्यामुळे सर्व मजुरांकडून त्यांचे बँक खात्याचे विवरण घेण्यात आले. त्यानुसार, कडीकसा येथील रहिवासी मुरलीधर भोजराज भंडारी या मजुराने आपल्या महाराष्ट्र बँकेतील खात्याचा क्रमांक तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे दिला. त्या कर्मचाऱ्याने मुरलीधरचा महाराष्ट्र बॅेकेचा खाते क्रमांक चिचगड कार्यालयात बिनचुक दिला. परंतु, वनविभागातील लिपिकाने मुरलीधरच्या नावापुढे महाराष्ट्र बँकेचा उल्लेख न करता यादीत भारतीय स्टेट बँकेच्या देवरी शाखेचा उल्लेख केला. परिणामी, मुरलीधरच्या मजुरीचे २ हजार ६६७ एवढी रक्कम महाराष्ट्र बँकेऐवजी स्टेटबँक देवरीकडे गेली. यामुळे मुरलीधरला त्याच्या मजुरीचे पैसे मिळाले नाही. ते पैसे मिळावे म्हणून मुरलीधर हा चिचगडच्या वनविभागाचे गेल्या सहा महिन्यापासून चकरा मारत आहे. तेथील वरिष्ठ लिपिक आणि संगणक परिचालक देशमुख हे त्याला उडवाउडवीची उत्तरे देऊन हाकलून लावत असल्याचा आरोप मुरलीधर व त्याचे वडील भोजराज यांनी केला आहे. सदर मजुराला स्टेट बँकेत जाऊन पैसे घे,असे सांगत असल्याने मुरलीधर आपल्या वडिलांसह देवरीच्या स्टेट बँकेत चकरा मारत आहे. तेथे सुद्धा त्याला समाधान कारक उत्तर बँकेचे अधिकारी देत नसल्याचे भोजराज भंडारी यांनी सांगितले. अनेकवेळा अर्ज करा असे सांगून नंतर ते अर्जसुद्धा घेत नसून दिवसभर बँकेत बसवून ठेवत असल्याचे भंडारी यांचे म्हणणे आहे. बँकेने सुद्धा त्यांचेकडील रक्कम अद्यापही वनविभागाच्या कार्यालयाला परत केली नाही. त्यामुळे एका गरीब आदिवासी मजुराची मजुरी बुडणार तर नाही ना, या भीतीने भंडारी कुटुंबीय चिंतातूर आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन मजुरी मिळण्यास मदत करावी, अशी मागणी मुरलीधर व त्याचे वडील भोजराज भंडारी यांनी वनविभागाकडे केली आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी चिचगड येथील वनाधिकाऱ्यांसी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.