सुरेश कदम : गणेशोत्सव शांततेत साजरा करा

0
12

गोरेगाव , ता.11: तालुक्यातील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सभा नुकतीच पंचायत समिती सभागृहात पार पडली. या सभेद्वारे सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी केले.सभेला मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्यासह उपनिरीक्षक श्रीधर खडके, नरेंद्र भड, डिलेश्वर पंधरे उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील ५५ गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. ५ सप्टेंबरपासून स्थापित केलेल्या गणेशाचे विसर्जन १५ सप्टेंबरपर्यंत करावयाचे आहे. १० दिवस विराजमान गणेशोत्सवात शांतता राहावी म्हणून घ्यावयाच्या काळजीबाबत सुरेश कदम यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यावर्षी सहाय्यक धर्मादाय आयुक्तालय यांच्यामार्फत सर्व मंडळांनी तात्पुरत्या १० दिवसांची नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी झालेल्या मंडळांना परवानगी मिळेल. पण नोंदणी न झालेल्या मंडळांना स्वजबाबदारीवर गणेशोत्सव साजरा करावा लागेल. यासाठी रितसर सूचनांचे पालन करून गावातील शांतता भंग होणार नाही. लेखी परवानगी शिवाय वर्गणी गोळा करू नये व रहदारी अडवू नये, मंडप बांधण्यासाठी खासगी व ग्रामपंचायत जागेची लेखी परवानगी द्यावी. गणेश मूर्तीचे आसन मजबूत करावे. पावसापासून संरक्षण करावे, सजावटीमध्ये हॅलोजन व प्रखर उजेड देणारे विद्युत बल्व वापरु नये. उत्सवामध्ये व मिरवणुकीमध्ये करण्यात येणाऱ्या देखाव्याची माहिती पोलीस ठाण्याला देऊनच देखावे सादर करावे. जातीय भावना दु:खवतील असे आक्षेपार्ह गाणे, पोवाडे, पोस्टर्स लावू नये. मंडपाच्या ठिकाणी, विद्युत खांबावर धार्मिक किंवा संघटनेचे झेंडे लावू नये. मद्यपान करून झगडा- भांडण करणाऱ्या व्यक्तीस पोलिसाच्या स्वाधीन करावे. मिरवणुकीत गुलाल उडवू नये. मोठ्या आवाजाचे फटाके फोडू नये. मिरवणुकीच्या वेळी लहान मुलांना वाहनाच्या वरच्या भागावर बसवू नये, असे मार्गदर्शन केले.मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली नावे, मोबाईल क्रमांक देऊन पोलीस विभागाला वेळोवेळी सूचना द्यावे व कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे सांगितले.