33.2 C
Gondiā
Wednesday, May 14, 2025
Home Blog Page 5662

अभिमत विद्यापीठांच्या स्वतंत्र प्रवेश प्रक्रियेला सुप्रीम कोर्टाची मनाई

0
वृत्तसंस्था
नवी दिल्ली,दि.16-  मेडिकलसाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया करता येणार नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने अभिमत विद्यापीठांना चांगलाच दणका दिला आहे. राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर आज आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यात सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली .
‘नीट’मार्फतच प्रवेश परीक्षा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.  त्यानंतर अभिमत विद्यापीठांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रिया घेण्याचा आदेश राज्याने दिला होता. याविरूद्ध अभिमत वैद्यकीय महाविद्यालये मुंबई उच्च न्यायालयात गेली होती. मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारच्या  आदेशाला स्थगिती दिली होती. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.
प्रवेश प्रक्रियेसाठी प्रत्येक अभिमत विद्यापीठ प्रत्येकी पाच हजार रुपये घेतं, म्हणजे आठ अभिमत विद्यापीठांसाठी चाळीस हजारांचा खर्च विद्यार्थ्यांना येईल. त्याऐवजी फक्त एक हजार रुपयांमध्ये राज्य सरकार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून देण्यास तयार आहे असे राज्य सरकारने दाखल केलेल्या विशेष याचिकेत म्हटले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे मात्र,त्यामुळे अभिमत विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शाखेतील प्रवेशाचा तिढा कायम आहे.

गुलाम गौस यांना भंडारा ‘जिल्हा भुषण’ पुरस्कार 

0


भंडारा : भंडाºयाचा राजा प्रतिष्ठा तर्फे दरवर्षी देण्यात येणारा जिल्हा भुषण हा मानाचा पुरस्कार तुमसर तालुक्यातील ७० वर्षीय गुलात गौस मो़इस्माईल यांना भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार यांच्या हस्ते बहाल करण्यात आला़. सामाजिक बांधिलकी जोपासत असतांना अनेक प्रतिभावंत प्रसिध्दीपासून दुर असतात, मात्र त्याचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरतात अशा प्रतिभावंताना भंडाराचा राजा या प्रतिष्ठानातर्फे ११ हजार रोख सन्मान पत्र, स्मृती चिन्ह देवून गौरविण्यात येतो़ यावर्षी हा पुरस्कार एका मुस्लीम धर्मिय समाज सेवकाला देवून जिल्ह्यात मानवतेचा परिचय दिला आहे़. याप्रसंगी अध्यक्ष पदावरुन बोलतांना खा़नाना पटोले यांनी भंडाराचा राजा या प्रतिष्ठानाची तोंड भरुन कौतूक केले़. बोलतांना ते म्हणाले भंडारा जिल्हा म्हणजे रत्नाची खान आहे़ गुलाम गौस सारख्या प्रतिभावंत समाजसेवाकाला या पुरस्काराने सन्मानित करुन या या प्रतिष्ठानाने जात धर्माच्या पलिकडे जाऊन मानवतेच्या परिचय करुन दिला आहे़. भंडारा जिल्ह्याला अजूनही मागासलेल्या जिल्हा संबोधला जाते़ आपल्या जिल्ह्यावर मागासलेपणाचा ठपका आहे़ मागासले पणातून घडलेला खैर लांजीचा कलंक अजूनही पुसल्या गेला नाही. तो कलंक पुसला जाऊ शकतो यासाठी सामाजिक स्तरातील काम करणाºया सर्व लोकांकडून मागासले पणाचा हा कलंक पुसून काढण्याचा काम या मंडळाकडून होत आहे असेही ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले. यावेळी व्यासपीठावर आमदार रामचंद्र अवसरे नगराध्यक्ष बाबुराव बागडे, सुनिल मेंढे, भरत खंडाईत, विकास मदनकर, प्रतिष्ठानाचे अध्यक्ष दिलीप बागडे, मंगेश वंजारी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तथा शहरातील गणमान्य व्यक्ती व पत्रकार उपस्थित होते़

प्रोग्रेसिव्ह शाळेत आजी-आजोबा दिवस उत्साहात

0

गोंदिया : उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह शाळेमध्ये मोठय़ा उत्साहात आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात आला. प्रोग्रेसिव्ह शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या आजी-आजोबांना सादर आमंत्रित करण्यात आले होते.ज्यात आजी-आजोबांची उपस्थिती उल्लेखनीय होती. उपस्थित पाहुण्यांचे स्वागतगीतांनी स्वागत करण्यात आले.या वेळी उपस्थित सर्व आजी-आजोबा यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी आजी-आजोबांनी आपले अनुभव आणि विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले गेले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘नाना तेरी मोरणी को चोर ले गये’ या गीतांद्वारे उपस्थितांचे मन जिंकून घेतले.कार्यक्रमाची रुपरेखा पंकज कटकवार यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, वाय.आशा राव, अभय गुरव, वीणा कावळे, कृष्ण चव्हाण, निधी व्यास, विलास नागदेवे, प्रमोद वाडी, वर्षा सतदेवे, सुषमा वर्षीकर, तोमेश पारधी, रूपकला रहांगडाले, सुरेखा बघेल, लीना ठाकरे, पट्रीसीया जॉर्डन व सर्व अध्यापकांनी सहकार्य केले. संचालन देवेंद्र राऊत यांनी केले. आभार महेंद्र हरिणखेडे यांनी मानले.

गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

0

यवतमाळ  दि. 16 –जिल्ह्यातील उमरखेड शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीवर गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता एका गटाकडून प्रचंड दगडफेक करण्यात आली. त्यात ५ पोलीस कर्मचाऱ्यांसह १६ जण जखमी झाले. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला हवेत गोळीबार करावा लागला. त्यांनी पाच राऊंड फायर केल्याचे सांगण्यात येते.

तांबोळीपुरा येथील छावा गणेश मंडळाची मिरवणूक नाग चौकाच्या वाटेवर आली असताना अचानक दगडफेक झाली. त्यामुळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक व पोलिसांचाही गोंधळ उडाला. या दगडफेकीत राज्य राखीव पोलीस दलाचे जवान रवींद्र शेडवाने, पोलीस कर्मचारी प्रशांत वानखडे, देवीदास कांबळे, चक्रधर नरवाडे, राठोड यांच्यासह पांडुरंग गव्हाणे, संतोष गव्हाणे, रामभाऊ खंदारे, गणेश पाटील, राजेंद्र बोंगिनवार, कृष्णा सूर्यवंशी, अशोक शिमरे, संजय कदम, रवी टेकाळे, सावन भोकरे, गजानन नंदनवार आदी जखमी झाले. त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

जिल्हाधिकारी सुर्यवंशी केंद्रीय सरक्षंणराज्यमंत्र्याचे खासगी सचिव

0

गोंदिया दि.१६: गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचे खासगी सचिव म्हणून बदली झाली आहे.जिल्हाधिकारी हे बदली करुन चालल्याचे वृत्त सर्वात आधी बेरार टाईम्सने आपल्या वाचकांना दिले होते.त्यातच १२ सप्टेबंर रोजी पालकमंत्री बडोले यांच्या पत्रकार परिषदेतही बेरार टाईम्स संपादकानी आपण गोंदिया सोडून चालल्याचे जिल्हाधिकारी यांना म्हटले होते.त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी त्यांचे बदली आदेश निघाल्याने बेरार टाईम्सच्यावृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.
डॉ.सूर्यवंशी गेल्या दिड वर्षापासून गोंदियात असून त्यांचा कार्यकाळात जिल्ह्यातील पर्यटनाला चांगली चालना मिळाली.परंतु जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयातील काही विभागप्रमुखांनी व नगरपालिकांनी योग्य सहकार्य न केल्यानेच त्यांना जी गोंदियाची ओळख कोल्हापूर सारखी तयार करायची होती ती करण्यात अधिकारी वर्गाकडूनच अडसर होऊ लागल्याने त्यांनी येथे काम करण्यापेक्षा बदली करुन गेलेले बर ठरवून धुळेचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचे खासगी सचिव म्हणून जाण्याचा निर्णय घेतल्याने गोंदिया जिल्हा मात्र काही कामचुकार अधिकारीवर्गाच्या भूमिकेमूळे चांगल्या जिल्हाधिकारीपासून वंचित राहणार आहे.जिल्हाधिकारी आज मुंबईत गोंदियाच्या सारस पर्यटनाची माहिती पत्रकारपरिषदेत पालकमंत्री यांच्यासोबत देण्याची शक्यता असून मुख्यमंत्र्याचा गोंदिया दौरा आटोपल्यानंतर ३० सप्टेबंरला ते कार्यमुक्त होण्याची शक्यता आहे.

विहिरीतील विषारी वायूने दोघांचा मृत्यू

0

रावणवाडी/गोंदिया  दि. 16 –: विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत कोचेवाही येथे गुरुवारी सायंकाळी ४ वाजतादरम्यान घडली. मृतांची नावे मुनेश्वर बिसेन (३५) व संजय बिसेन (२५) अशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुनेश्वर व संजय हे दोघे शेतात काम करीत असताना तहान लागल्याने मुनेश्वर विहिरीकडे गेला. विहिरीतून पाणी काढत असताना विहिरीतील विषारी वायूमुळे त्याचा जीव गुदमरून तो विहीरीत पडला. यावेळी मदतीसाठी त्याने काही अंतरावर असलेल्या संजयला आवाज दिला आणि नंतर तो बेशुद्ध पडला. संजय त्याला वाचविण्यासाठी धावला असता तोही विषारी वायुमुळे विहिरीत पडला आणि दोघांचाही मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच रावणवाडीचे ठाणेदार संजीव गावंडे घटनास्थळी पोहोचले. माहिती देताना त्यांनी सांगितले की, उपस्थित लोकांनी त्या विहिरीत जिवंत कोंबडी सोडली असता तिचा मृत्यू झाला. यावरून विहिरीत विषारी वायू असल्याची पुष्टी झाल्याचे त्यांनी सांगितले.

पेट्रोल महाग तर डिझेल स्वस्त

0

नवी दिल्ली, दि.१६ : तेल पुरवठा कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रती लिटर ५८ पैशांनी वाढ केली आहे. मात्र डिझेलचे भाव प्रती लिटर ३१ पैशांनी कमी करण्यात आले आहेत. या वाढीव दरात राज्य सरकारांच्यावतीने लावल्या जाणाऱ्या करांचा समावेश नाही. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत. महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या लोकांना पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा झटका दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती वाढल्यानं ही भाववाढ केल्याची माहिती यावेळी इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं दिली आहे.

इंधनाचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर सरकारी तेल कंपन्या दर पंधरा दिवसांनी, म्हणजेच दर महिन्याची पहिल्या आणि 16 व्या दिवशी इंधनाचे नवे दर जाहीर करतात. यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतील कच्च्या तेलाच्या किमती आणि परकीय चलनाचा विनिमय दर याचा आधार घेतला जातो. याच आधारावर इंधनदरात कपात व वाढ याबाबत निर्णय घेण्यात येतो.

इस्लामपुरात नगराध्यक्षांवर हल्ला

0

इस्लामपूर  दि. 16 –: इस्लामपूर शहराचे नगराध्यक्ष सुभाष यशवंत सूर्यवंशी (वय ५४) यांच्यावर बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एकाने कोयत्याने हल्ला चढविला. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या खुनी हल्ल्यात सूर्यवंशी यांच्या मानेवर वार झाला. यावेळी हल्लेखोराशी झालेल्या झटापटीत त्यांचा चालकही जखमी झाला आहे.हल्लेखोराने सूर्यवंशी यांच्या दुचाकीला पाठीमागून येऊन धडक देऊन भर रस्त्यावर हा हल्ला केल्याने शहरात खळबळ माजली होती. हल्लेखोराने दुचाकीवरून पलायन केले.

जितेंद्र बापू सूर्यवंशी (वय ३०, रा. बुरूड गल्ली, इस्लामपूर) असे हल्लेखोराचे नाव आहे. नगराध्यक्ष सुभाष यशवंत सूर्यवंशी (वय ५४, रा. बुरूड गल्ली, इस्लामपूर) यांच्यासह चालक सिद्धार्थ सावंत (वय ३०, रा. इस्लामपूर) हे सुद्धा जखमी झाले आहेत. दोघांवर यल्लम्मा चौकातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेतील सत्ताधारी गटाचे ज्येष्ठ नेते विजयभाऊ पाटील, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शहाजी पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, आयुब हवालदार, सुभाष देसाई, डॉ. संग्राम पाटील, मानसिंग पाटील, रवींद्र सूर्यवंशी, संभाजी कुशिरे, संदीप माने, संदीप पाटील यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. सूर्यवंशी यांचे कुटुंबीय, नातेवाईक व समर्थक कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.

प्रशांत कुत्तरमारेंना अटकपूर्व जामीन

0

गडचिरोली  दि. 16 –जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत परशुराम कुत्तरमारे (४२) यांना महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या विनयभंग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हा निर्णय दिला.

२१ आॅक्टोबर रोजी अल्लापल्ली (ता. मुलचेरा) येथील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी कुत्तरमारे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५४ व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम ३(१)(१२) अन्वये एफआयआर नोंदविला आहे. कुत्तरमारे यांनी याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सुरुवातीला गडचिरोली सत्र न्यायालयात अर्ज सादर केला होता. हा अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, २० आॅक्टोबर रोजी सकाळी १० च्या सुमारास कुत्तरमारे प्राथमिक आरोग्य केंद्रात आढावा घेण्यासाठी गेले होते. केंद्रात १५ पैकी ४ कर्मचारी गैरहजर होते. कुत्तरमारे हे फिर्यादीला यावर स्पष्टीकरण सादर करण्यास सांगून निघून गेले. यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास कुत्तरमारे यांनी फिर्यादीच्या मोबाईलवर कॉल करून आक्षेपार्ह विचारपूस केली. फिर्यादीने आधी जिल्हाधिकाऱ्यांना आपबिती सांगितली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. कुत्तरमारे यांच्यातर्फे अ‍ॅड. संग्राम सिरपूरकर यांनी बाजू मांडली.

विसर्जन करताना माणिकवाडात ‘सेल्फी’ तिघांच्या जीवावर बेतली

0
वर्धा, दि. 15 – आष्टी (शहीद) तालुक्यातील माणिकवाडा येथील युवक गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी तारासावंगा येथील कड नदीच्या पात्रात गेले. विसर्जन करताना त्यांना सेल्फीचा मोह झाला. अशातच तोल जावून चारजण पाण्यात बुडाले. यात तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर एकाचा वाचविण्यात यश आले. ही घटना  गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
हंसराज रमेश सोमकुंवर (२६), केवल सुरेश मसराम (२०) व चेतन गेंदराज नेहारे (१९) अशी मृतकांची नावे आहेत.  या घटनेने माणिकवाडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेतून पंकज खवशी हा सुदैवाने बचावला. तिघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. बचावलेल्या पंकज खवशी याने लगेच घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली.  तिघांनाही वाचविण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र पाणी जास्त खोल असल्यामुळे यात यश आले नाही. यामध्ये त्या तिघांचाची करुण अंत झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास कानडे, ठाणेदार दिलीप ठाकूर, तारासावंगाचे सरपंच रत्नपाल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.