23 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ महाराजस्व अभियानातून महसूल विभाग लोकाभिमुख करा- अनूप कुमार

महाराजस्व अभियानातून महसूल विभाग लोकाभिमुख करा- अनूप कुमार

0
49

गोंदिया, दि.२ : महसूल विभाग प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. अनेकांचा दैनदिन कामानिमित्त महसूल विभागाशी संबंध येतो. कामानिमित्त नागरिकांना तहसिल, उपविभागीय अधिकारी कार्यालयात वारंवार जावे लागते. हे थांबविण्यासाठी योग्य नियोजन करा. यावर्षात जिल्हयात आयोजित करण्यात येणाऱ्या महाराजस्व अभियानातून जनतेची जास्तीत जास्त कामे करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महसूल विभाग लोकाभिमुख करावा. असे आवाहन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १ ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त जिल्हयात महाराजस्व अभियान – २०१५ राबविण्याबाबत आयोजित महसूल अधिकाऱ्यांच्या सभेला विभागीय आयुक्त श्री. अनूप कुमार बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी नरेन्द्र लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री अनूप कुमार म्हणाले, महसूल विभागाशी संबंधित नागरिकांची कामे वेळेत व पारदर्शकपणे करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. समाधान शिबीराच्या माध्यामातून नागरिकांशी संबंधित असलेली कामे करण्यासाठी तर विस्तारीत समाधान शिबीराच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासोबतच योजनांचा लाभ देण्यात यावा असेही सांगितले.
महसूल विभागाबाबत जनतेमध्ये असलेला पूर्वग्रह बदलविण्यासाठी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कल्पकतेतून महाराजस्व अभियान राबवावे असे सांगून अनूप कुमार म्हणाले, कोणताही लाभार्थी हा योजनांपासून वंचित राहणार यासाठी काम करावे. महाराजस्व अभियानाची माहिती दुर्गम भागातील नागरिकांना देऊन त्यांना अभियानात सहभागी करुन घेण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी प्रोत्साहन दयावे.
महसूल अधिकाऱ्यांकडे ६ महिन्यांपेक्षा जास्त प्रलंबित सर्व अर्ध न्यायिक प्रकरणे डिसेंबर-२०१६ पर्यंत अंतिम निर्णय देऊन निकाली काढावीत. एका महिन्यापेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढण्यासाठी मंडळ मुख्यालयी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात यावे. महाराजस्व अभियानातंर्गत दिलेली उद्दिष्टपूर्ती पूर्ण करण्यात यावी असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, महसूल विभागाकडून विविध प्रकारची प्रमाणपत्रे देण्यात येतात. भविष्यात प्रमाणपत्रावर होलोग्राम करण्याचा विचार आहे. त्यामुळे बनावट प्रमाणपत्रे तयार करण्याला आळा बसेल. मंडळ स्तरावर देखील विस्तारीत समाधान शिबीर राबविण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी जिल्हयातील महसूल विभागाची पदभरती, पदोन्नती, अभिलेख कक्ष अद्ययावत करणे, जडवस्तू संग्रह नोंदवहीचे अद्ययावतीकरण करणे, महालेखापाल जमा लेखा परिच्छेदातील वसुलीची कार्यवाही, दफ्तर तपासणी करण्याबाबतची माहिती दिली.
सभेला उपजिल्हाधिकारी उमेश काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, सुनिल सूर्यवंशी, जिल्हा खनीकर्म अधिकारी बोमीडवार, जिल्हा नियोजन अधिकारी बकूळराव घाटे तसेच सर्व तहसिलदार उपस्थित होते.