
सुरेश भदाडे
देवरी(गोंदिया),दि. २९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटीत व्हावा आणि संघर्ष करा हा मुलमंत्र दिला. त्यांना या देशात धर्मनिरपेक्ष समाज रचना निर्माण करायची होती. १९५६ मध्ये बुध्द धम्माचा स्विकार करुन त्यांनी समाजाच्या प्रगतीचे स्वप्न बघितले. परंतू त्यांना अभिप्रेत असलेला समाज आजवर निर्माण झाला नाही. अशी खंत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्ती केली.
देवरी तालुक्यातील चिचगड येथील भिमभूमीवर २८ फेब्रुवारी रोजी बौध्द समाज संस्था चिचगडच्या वतीने आयोजित भिम मेळाव्याच्या अध्यस्थानावरुन श्री बडोले बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन खा.अशोक नेते यांनी केले. आमदार संजय पुराम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, जिल्हा परिषद सदस्य अलताफभाई हमीद, उषा शहारे, भाजपाचे महामंत्री विरेंद्र अंजनकर, भाजपा तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार, किसन जांभूळकर, नरेंद्र शहारे यांची प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री पूढे म्हणाले, समाजातील ९० टक्के लोक भूमीहीन आहेत. देशातील ओबीसी, एससी व एसटी हा मागास नसला पाहिजे हे बाबासाहेबांचे स्वप्न होते. आजही त्यात फार बदल झालेला नाही. मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांसाठी बाबासाहेबांनी त्या काळात आंदोलने केली. आरक्षणामुळे समाजाची स्थिती फार मोठी बदललेली नाही. दारिद्रयरेषेखाली राज्यात एससी एसटीची संख्या मोठी आहे. शिक्षणामुळेच समाजाची प्रगती शक्य आहे.
उद्घाटक म्हणून बोलतांना खा. नेते म्हणाले, येथील भिमभूमीच्या बांधकामासाठी १० लक्ष रुपये निधी देण्यात येईल.आमदार पुराम म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी आमदार झालो. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराचा मी आहे. समाजाने पोटजातीत भेदभाव करु नये. आदिवासी व दलीत बांधवांचा विकास झाला पाहिजे. कोणत्याही धर्मावर टिका करु नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून मागास घटकांसाठी राजकीय सत्तेची चाबी दिली आहे. तिचा योग्यप्रकारे वापर केला पाहिजे. भिमभूमीच्या बांधकामासाठी ५ लक्ष रुपये निधी देणार असल्याचे पुराम यांनी सांगितले.





