
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सत्येंद्र कुमार यांनी नागपूर विभागाचा पाहणी दौरा करून प्रवासी सुविधांचा आढावा घेतला. मोतीबाग येथे सुरु करण्यात आलेल्या स्विमींग पुलचे उद््घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सत्येंद्र कुमार यांनी आपल्या दोन दिवसीय पाहणी दौर्यात तिरोडी-तुमसर, कन्हान-रामटेक-इतवारी सेक्शनचे निरीक्षण केले. निरीक्षणादरम्यान त्यांनी तिरोडी स्टेशन, डोंगरीबुजुर्ग रेल्वेस्थानकामधील पुल क्रमांक ४७, गोबरवाही आणि तुमसर रोड स्टेशन आणि रेल्वे कॉलनी, रामटेक आणि इतवारी रेल्वेस्थानकाचे निरीक्षण केले. तेथील पायाभूत सुविधा, स्वच्छतेचा दर्जा आणि सुरक्षेशी निगडित बाबींची त्यांनी पाहणी केली. भंडारा येथे सीसीटीव्ही यंत्रणेचे उद््घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. चाचेर येथील नव लेव्हल क्रॉसींग गेट क्रमांक ५५४ आणि चाचेर-सालवा स्टेशन दरम्यान किलोमिटर क्रमांक ११0१/५.७ येथील लिमिटेड हाईट सब वेचे उद््घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांच्यासह बिलासपूर झोनमधील सर्व विभागाचे विभाग अध्यक्ष उपस्थित होते. दौर्या दरम्यान महाव्यवस्थापकांनी स्थानिक लोक प्रतिनिधी, प्रवासी संघटनांचे सदस्य आणि पत्रकारांशी चर्चा केली. त्यांनी मोतीबाग वर्कशॉपची बारीक पाहणी केली. कार्यशाळेत तयार करण्यात आलेल्या १२ बायो डायजेस्टर टँक ठेवलेल्या ट्रकला हिरवी झेंडी दाखवून भोपाळकडे रवाना केले. याशिवाय मोतीबाग येथील वॉटर टँक, इलेक्ट्रॉनिक रोड वे ब्रिज, रोलर बेअरींग आणि मोतीबाग मैदानाजवळील स्विमींग पुलाचे उद््घाटन त्यांनी केले.





