
*लवकरच ओबीसींची वसतीगृहे साकारणार!*
गोंदिया,दि.०१ःराज्य सरकारने गोंदियासोबतच इतर ९ जिल्ह्यातही कृषी,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या ओसाड असलेल्या जागा ओबीसी वसतिगृहाकरीता हस्तांतिरत करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने, ३० जुलै २०२५ ला शासन निर्णय काढून घेतला आहे.त्यामुळे *गोंदिया,चंद्रपूर,अकोला, यवतमाळ,वाशिम,सोलापूर,धुळे, धाराशिव,अमरावती व सांगली*या जिल्ह्यांतील ओबीसी वसतिगृह इमारतीचा जागेचा प्रश्न निकाली निघाली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील अनेक संघटना ओबीसी विद्या्र्थ्यांकरीता वसतिगृह सुरु करावे याकरीता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते.त्यानुसार गेल्यावर्षी आँक्टोंबर २०२४ मध्ये राज्यात ५४ वसतिगृह ओबीसी मुलामुलींचे भाड्याच्या इमारतीमध्ये सुरु करण्यात आले.त्या वसतिगृहाकरीता शासकीय जागा उपलब्ध व्हावी याकरीता सातत्याने शासनााकडे पाठपुरावा सुरु होता.त्यानुसार ओबीसी बहुजन कल्याण उपायुक्त विनोद मोहतुरे यांच्या उत्कृष्ठ कार्यप्रणालीने ओबीसी मुलामुलींच्या वसतिगृह जागेचा प्रश्न निकाली निघाल्याने ओबीसी अधिकार मंच व इतर संंघटनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया मुख्यालयात सुध्दा मुलामुलींकरीता जागा उपलब्ध व्हावे याकरीता ओबीसी अधिकार मंच,ओबीसी सेवा संघ,ओबीसी संंघर्ष कृती समिती व समविचारी संघटना काम करीत होत्या.ओबीसी बहुजन कल्याण विभागाचे जिल्ह्यातील उपायुक्त विनोद मोहतुरे यांनी गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी वसतिगृह सुरु व्हावेत आणि शासकीय जागा मिळावी,याकरीता ओबीसी संघटनाच्या प्रतिनिधींशी सातत्याने संवाद साधत प्रशासनाकडे तीन ते चार जागांचा प्रस्ताव २०२३-२४ मध्येच सादर केलेला होता.त्यापैकी ओबीसी मुलींच्या वसतिगृहाकरीता छोटा गोंदिया परिसरात असलेल्या तंत्रनिकेतन शाळेच्या परिसरातील जागेला जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी प्राध्यान्य देत मंजुरी दिली होती.त्यानंतर ओबीसी मुलांच्या वसतिगृहाकरीता जागेचा शोध शहराच्या परिसरात घेत असतानाच कुडवा येथील राज्यसरकाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या ताब्यात असलेल्या मोकळ्या जागेचा प्रस्ताव सुध्दा १ वर्षाआधीच राज्यसरकारकडे ओबीसी बहुजन कल्याण विभागाचे उपायुक्त विनोद मोहतुरे यांनी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने सादर केले होते.त्या प्रस्तावाला राज्यसरकारने ३० जुर्ले २०२५ रोजी मंजुरी दिल्याने ओबीसी मुलांच्या वसतिगृहाच्या जागेचा प्रस्ताव सुध्दा निकाली निघाली आहे.





