25.8 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home विदर्भ गंभीर अवस्थेतील ‘छोटा मटका’ अखेर जेरबंद!

गंभीर अवस्थेतील ‘छोटा मटका’ अखेर जेरबंद!

0
94

चंद्रपूर-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘छोटा मटका’ नावाने ओळखला जाणारा दबंग वाघ अखेर गंभीर अवस्थेत जेरबंद झाला. त्याने तीन महिन्यापूर्वी ‘ब्रम्हा’ या तरूण वयाच्या वाघाला ठार केले होते.तेव्हापासून तो प्रकाशझोतात आहे. त्या झुंजीत ‘छोटा मटका’ही जखमी झाला होता. मात्र, सारेकाही आलबेल असल्याचे वनविभाग सांगत असतानाच, त्यांच्या गंभीर प्रकृतीबद्दल थेट न्यायालयानेच दखल घेतली. अखेर ‘छोटा मटका’ यास जेरबंद करून त्यावर उपचार सुरू करण्यात आले.

बुधवार, 27 ऑगस्ट रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर) अंतर्गत खडसंगी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 51 मधून गंभीर जखमी अवस्थेतील वाघ टी-126 अर्थात, ‘छोटा मटका’ यास जेरबंद करण्यात आले आहे. या वाघास आवश्यक वैद्यकीय तपासणी व पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथील ‘ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर’ येथे हलविण्यात आले आहे.

12 मे 2025 रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खडसंगी बफर परिक्षेत्रांतर्गत निमढेला नियतक्षेत्राच्या कक्ष क्रमांक 63 मधील उमरीखोरा परिक्षेत्रात टी-126 (छोटा मटका) व टी-158 (ब्रम्हा) या दोन वाघामध्ये तीव्र संघर्ष झाला होता. या झुंजीत टी-158 वाघाचा मृत्यू झाला. तर टी-126 गंभीर जखमी झाला होता.

एनटीसीएच्या मानक कार्यपद्धतीनुसार व त्या अन्वये गठित तांत्रिक समितीच्या शिफारशीनुसार, महाराष्ट्रातील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांनी जखमी टी-126 हा वाघ मानव-वन्यजीव संघर्षास कारणीभूत ठरू शकतो. अनुचित मनुष्यहानीची घटना टाळ्ण्याकरिता या जखमी वाघास जेरबंद करून चंद्रपूर येथील ‘ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर’ येथे उपचार करण्यात यावा, असे आदेश 27 ऑगस्ट रोजी पारित केले.

ही कारवाई ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक प्रभू नाथ शुक्ल व उपसंचालक (बफर) आनंद रेड्डी यांच्या मार्गदर्शनखाली ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या शीघ्र कृती दलाकडून सहाय्यक वनसंरक्षक अनिरुद्ध ढगे यांच्या देखरेखीखाली पार पाडण्यात आली.

blank