29.7 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ प्रशासकीय इमारतीत आग दस्ताएेवज व फर्निचर जळाले; शार्टसर्कीटमुळे आग

प्रशासकीय इमारतीत आग दस्ताएेवज व फर्निचर जळाले; शार्टसर्कीटमुळे आग

0
71

गोंदिया ः येथील जयस्तंभ चाैकालगतच्या प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या माळ्यावरील सह जिल्हा निबंधक वर्ग-१ व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता.४) सकाळी अकरा ते साडेअकराच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत संबंधित विभागातील काही दस्ताएेवज व फर्निचर जळाले. शार्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

शनिवार, सुटीचा दिवस असल्याने प्रशासकीय इमारतीत तसाही शुकशुकाट होता. अन्य काही विभागांचे अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर होते. तथापि, सकाळी अकरा ते साडेअकराच्या सुमारास दुसऱ्या माळ्यावरील सह जिल्हा निबंधक वर्ग-१ व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातून अचानक धूर निघताना लगतच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिसला. त्यांनी तत्काळ समयसूचकता दाखवून सह जिल्हा निबंधक वर्ग-१ व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाचा दरवाजा तोडला. त्यानंतर कार्यालयातील अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने व पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. काही क्षणात ही आग आटोक्यात आली. मात्र, या आगीत सदर कार्यालयातील दस्ताएेवज आणि फर्निचर जळाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालय गाठून पाहणी केली. शार्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मोठा अनर्थ टळला…
शनिवार, साप्ताहिक सुटी असल्यामुळे प्रशासकीय इमारतीत अधिकारी, कर्मचारी आणि अन्य नागरिकांची रेलचेल नव्हती. सह जिल्हा निबंधक वर्ग-१ व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय बंद होते. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
……………………….