मोहाटोला येथील पिडीतांचा आरोप
गोंदिया : नवरात्रोत्सवनिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमात मोहाटोला येथे चार ते पाच हून अधिक महिलांना पुरूषांना सामुहिक मारहाण करण्यात आली. या घटनेतील जखमींनी स्वतः प्राथमिक उपचार करून पोलिस स्टेशन गाठले. मात्र सालेकसा पोलिस स्टेशनमध्ये स्टेशन डायरीवर कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचाऱ्यांनी तब्बल रात्रभर पिडितांना बसवून ठेवले. दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातही आरोपींकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला. एंकदरीत हे प्रकरण सामुहिक मारहाण तथा मॉब लिचिंग सारखे असतानाही सालेकसा पोलिस गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. उलट आरोपींना अभय दिले जात आहे. परिणामी आरोपी विजय मिरवणूक काढून आमचे कुणीही काही बिघडवू शकत नाही, असे बोलून गावात शांतता व सुव्यवस्था भंग करीत आहेत. असा आरोप पिडितांनी केला आहे.
मोहाटोला येथे सार्वजनिक नवरात्रोत्सव दरम्यान शारदा मुर्ती स्थापित करण्यात आली होती. सार्वजनिक शारदा उत्सव समितीच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी महाप्रसाद वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचा लाभघेण्यासाठी गावातील सर्व नागरिक सहभागी झाले होते. त्यातच रूपाली बनोटे महाप्रसादासाठी मंडपी येवू न शकलेल्या व्यक्तींकरीता महाप्रसाद टिफीन डब्ब्यात मागितले. यावरून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सदर महिलेला शिवीगाळ सुरू केली. त्यातच महिलेला १८ वर्षीय मुलगा ओमेश बनोटे हा मध्यस्थी करण्यासाठी आला असताना समितीच्या दोन सदस्यांनी फावड्याने मारहाण केली. यामध्ये मुलगा व त्याची आई गंभीररित्या जखमी झाले. या घटनाक्रमात समिती मधील चमन हटवार, घनश्याम बनोटे या मुख्य आरोपीसह काही आरोपींनी मारहाण सुरू केली.
यात जे लोकं मध्यस्थीसाठी आले त्यातील मोहनलाल बनोटे, संजय ठाकरे यांना देखील जबर मारहाण करण्यात आली. एंकदरीत समितीच्या २० ते २५ सदस्यांनी सामुहिकरित्या मॉब लिचिंगसारखी मारहाण केली. याप्रकरणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या रोहित बनोटे याला देखील जबर मारहाण करण्यात आली. हे प्रकरण २ ऑक्टोबरच्या रात्री ८ ते १० वाजता दरम्यानची आहे. दरम्यान सर्व जखमी उपचारासाठी सालेकसा ग्रामीण रूग्णालयात पोहोचले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सर्व पिडित सालेकसा पोलिस ठाण्यात पोहोचले. कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी औरासे यांनी याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही. उलट रूग्णालयात जाण्याऐवजी पोलिस स्टेशनला का आले नाही, असे बोलून रात्री २ वाजतापर्यत बसवून ठेवले. त्यातही कसलाही गुन्हा दाखल केला नाही. दुसऱ्या दिवशी देखील पिडितांना बोलविण्यात आले. त्याचबरोबर आरोपीकडूनही गुन्हा दाखल करुन घेण्यात आला.
या प्रकरणात एंकदरीत पोलिस कर्मचारी औरासे व बिट जमादार निमजे हे आरोपींना अभय देत या प्रकरणाला वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न करीत आहेत. असा आरोप आयोजित पत्र परिषदेत पिडीतांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पिडितांना न्याय द्यावा तसेच आरोपीवर कायदेशिर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. आयोजित पत्र परिषदेत प्रेमवती बनोटे, रूपाली बनोटे, निर्मला कुसाम, हिराबाई बनोटे, प्रभाबाई मौदेकर, चंद्रकला बनोटे, ओमश्वरी बनोटे, रोहित बनोटे, उमेश बनोटे, संजय ठाकरे, दिपक बनोटे, दिनेश बनोटे, योगेश मोहारे यांच्यासह आदि उपस्थित होते.





