31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय रिपब्लिकन पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढविणार-बाळासाहेब खोब्रागडे

रिपब्लिकन पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढविणार-बाळासाहेब खोब्रागडे

0
44

blank

गडचिरोली, २६ ऑक्टोबर- रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांना एकत्र करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपूर्ण ताकदीने लढवू, अशी घोषणा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण उर्फ बाळासाहेब खोब्रागडे यांनी केली.
पक्षाच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी ही घोषणा केली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे होते, प्रमुख अतिथी म्हणून, केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, अशोक निमगडे, संत सैनिक दलाचे अशोक टेंभरे, रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे अध्यक्ष राजास खोब्रागडे, कम्युनिस्ट पार्टीचे देवराव चवडे, प्रदेश उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, प्रदेश सचिव प्राचार्य प्रकाश दुधे, ज्येष्ठ नेते पुनेश्वर दुधे, डॉ. हरिदास नंदेश्वर, सुरेखा बारसागडे, केंद्रीय सदस्य राजाभाऊ खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रेमदास बोरकर, सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीता सहारे, सरचिटणीस ज्योती उंदीरवाडे, अरुणा राऊत, बौद्ध महासभेचे प्रा. गौतम डांगे, विधानसभा प्रमुख प्रदीप भैसारे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवा आघाडीचे नरेंद्र रायपुरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
रिपब्लिकन चळवळ मजबूत व गतिमान करणे आज काळाची गरज आहे असे सांगून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या काळातील पक्षाचे वैभव पुन्हा एकदा प्राप्त करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही बाळासाहेब यांनी यावेळी केले.रोहिदास राऊत म्हणाले, रिपब्लिकन पक्ष नेहमीच दलित, शोषित लोकांसाठी संघर्ष करीत राहिलेला आहे आणि हा संघर्ष अजूनही सुरूच आहे. भूमिहीनांच्या सत्याग्रहासहित या पक्षाने केलेली अनेक आंदोलने आजही लोकांच्या स्मरणात आहेत. निवडणुकीच्या राजकारणातही पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. आज पुन्हा एकदा या पक्षाला बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
रिपब्लिकन पक्ष हे एका आंदोलनाचे नाव आहे असे सांगून अशोक निमगडे यांनी पक्षाच्या गत काळातील इतिहासाचा आढावा घेतला आणि रिपब्लिकन पक्षच सामान्य जनतेला न्याय मिळवून देऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी अन्य मान्यवर पाहुण्यांचीसुद्धा समयोचित भाषणे झाली व सर्वांनी रिपब्लिकन पक्ष बळकट करण्यावर भर दिला. या मेळाव्यात रिपब्लिकन पक्षाच्या ध्येयधोरणावर विश्वास ठेवून अनेक महिला तथा पुरुष कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला व सर्वांचे स्वागत करण्यात आले.प्रास्ताविक प्रा. प्रकाश दुधे यांनी केले. संचालन प्रा. राजन बोरकर यांनी, तर आभार नरेंद्र रायपुरे यांनी मानले.

blank