
सेनगाव : सेनगाव तालुक्यातील धनौरा शिवारात भरदिवसा सराफ व्यापाऱ्यावर हल्ला करून सुमारे ६ लाख ९७ हजार ५०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असुन तिन पथकाद्वारे तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफा व्यापारी सुरेश संभाजी कंधारकर रा. लोणार, जि. बुलढाणा यांचे सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथे सोने-चांदीचे दुकान आहे. ३० जानेवारी रोजी दुपारी सुमारे ४ वाजता, भावाच्या निधनाची बातमी मिळाल्याने ते दुकान बंद करून दुचाकीने कापडसिंगी येथून रिसोडकडे जात असताना धनौरा शिवारात दबा धरून बसलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांचा पाठलाग केला.
दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी दुचाकीला धडक देऊन फिर्यादीस खाली पाडले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून मारहाण करत जवळील बॅग जबरदस्तीने हिसकावली. या बॅगेत ११४.५ ग्रॅम सोने, ३६०० ग्रॅम चांदी, रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण ६,९७,५००/- किमतीचा ऐवज लूट करून तिन्ही आरोपी दुचाकीवरून पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले,सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराय घेवारे, दिपक मस्के, टि.के.वंजारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्हे शाखेची पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के करीत असून, अद्याप आरोपी अटक झालेले नाहीत. भरदिवसा घडलेल्या या धाडसी लुटीमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





