23.9 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home शैक्षणिक ब्रिस्टल विद्यापीठासोबत सामंजस्य करार; नवी मुंबई एज्यु-सिटीतील आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी संयुक्त शिक्षण व...

ब्रिस्टल विद्यापीठासोबत सामंजस्य करार; नवी मुंबई एज्यु-सिटीतील आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी संयुक्त शिक्षण व संशोधनासाठी पुढाकार

0
31

मुंबई विद्यापीठाची जागतिक शैक्षणिक सहकार्याची नवी दिशा

मुंबई, दि. १० मार्चः उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दिशेने मुंबई विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ब्रिटनमधील ब्रिस्टल विद्यापीठासोबत व्यापक शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून शैक्षणिक, संशोधन तसेच अध्यापन आणि संशोधकांच्या देवाणघेवाणीला चालना देण्याबरोबरच विविध संयुक्त उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या कराराअंतर्गत भूगोल, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, नॅनोसायन्स व नॅनोतंत्रज्ञान, हवामान बदल तसेच शाश्वतता अध्ययन या क्षेत्रांमध्ये शैक्षणिक आणि वैज्ञानिक सहकार्य वाढविण्यावर दोन्ही विद्यापीठांनी भर दिला आहे. संयुक्त संशोधन प्रकल्प, कार्यशाळा, परिषद, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी सह पदवी अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहे. ब्रिस्टल विद्यापीठाने मुंबईमध्ये आपला कॅम्पस सुरू केल्यामुळे या सहकार्याला आणखी बळ मिळणार असून दोन्ही संस्थांदरम्यान दीर्घकालीन शैक्षणिक संबंध प्रस्थापित होणार आहेत.

नुकत्याच गोवा येथे झालेल्या या सामंजस्य करारावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि ब्रिस्टल विद्यापीठाच्या प्रो-व्हाइस चान्सलर (ग्लोबल एंगेजमेंट) प्रा. मिशेल अच्युटो यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी मुंबई विद्यापीठ आणि ब्रिस्टल विद्यापीठ यांच्यातील हा करार विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण व संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. भूगोल, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, नॅनोसायन्स, हवामान बदल आणि शाश्वतता अध्ययन या भविष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन आणि सह पदवी अभ्यासक्रम राबविल्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान आणि कौशल्ये मिळणार असून अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे मुंबई विद्यापीठाची जागतिक शैक्षणिक उपस्थिती अधिक सशक्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुंबई येथील ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या कैम्पस येथेही कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.एव्हलिन वेल्च यांच्यात या सामंजस्य कराराबद्दल चर्चा झाली.

दरम्यान, नवी मुंबई येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एज्यु-सिटी प्रकल्पाअंतर्गत परदेशी विद्यापीठांसोबत शैक्षणिक आणि संशोधन सहकार्य वाढविण्याच्या दिशेने विद्यापीठाने प्रयत्न सुरू केले आहेत. याच अनुषंगाने ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया सोबत सागरी अध्ययन, सागरी संशोधन तसेच स्पोर्ट्स सायन्सच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या सहकार्यामुळे समुद्र विज्ञान, किनारी परिसंस्था, सागरी संसाधनांचे व्यवस्थापन तसेच क्रीडा विज्ञानाच्या आधुनिक पद्धतींचा अभ्यास आणि संशोधनाला चालना मिळणार आहे. तसेच संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी व प्राध्यापकांची देवाणघेवाण आणि प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत. याशिवाय नवी मुंबई एज्यु-सिटीमध्ये स्थापन होणाऱ्या इतर आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबतही मुंबई विद्यापीठ शैक्षणिक सहकार्याचे करार करण्याच्या तयारीत असून यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.