26.3 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home शैक्षणिक इम्पिरियल कॉलेज ऑफ फार्मसी, तिरोडा येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व पालक मेळावा

इम्पिरियल कॉलेज ऑफ फार्मसी, तिरोडा येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व पालक मेळावा

0
9

चित्रा कापसे/तिरोडा-इम्पिरियल कॉलेज ऑफ फार्मसी, तिरोडा येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करण्यासोबतच महाविद्यालय व पालक यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, कर्मचारी आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रगत विद्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भूमेंद्र भोंगाडे आणि सचिव श्री. अनुप बोपचे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक खुलली.
समारंभात शैक्षणिक गुणवत्ता तसेच विविध सहशालेय उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. भूमेंद्र भोंगाडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शिस्त, समर्पण आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या बळावर उच्च ध्येय गाठण्याचे आवाहन केले. तसेच इम्पिरियल कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे दिल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आणि सक्षम फार्मसी व्यावसायिक घडविण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
प्रमुख पाहुणे श्री. अनुप बोपचे यांनी विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. पालक मेळाव्यामुळे पालक व शिक्षक यांच्यात प्रभावी संवाद निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले.
पालक मेळाव्यादरम्यान प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, शिस्त तसेच फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत पालकांशी सविस्तर चर्चा केली. महाविद्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे पालकांनी मनापासून कौतुक केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रलय बऱ्हेवार यांनी उपस्थित मान्यवर व पालकांचे स्वागत करून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच शैक्षणिक यश व व्यावसायिक उत्कृष्टता साध्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गुणवत्तापूर्ण फार्मसी शिक्षण देण्याच्या महाविद्यालयाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. अजिता केशरवानी यांनी आभार प्रदर्शन करून प्रमुख पाहुणे, पालक, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवचैतन्य मिळाले असून महाविद्यालय व पालक यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले आहेत. इम्पिरियल कॉलेज ऑफ फार्मसी, तिरोडा हे गुणवत्तापूर्ण फार्मसी शिक्षण, शैक्षणिक उत्कृष्टता, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

blank