गोंदिया, दि.11 : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील 11 वी, 12 वी व त्यानंतरचे व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेले, सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रीयेनंतर वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https//hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन सुरु करण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 26 डिसेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता व शैक्षणिक साहित्यासाठी लागणारी आर्थिक मदत थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत केली जाते. त्याकरीता विद्यार्थ्यांना https//hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक होते. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयामार्फत त्रुटी पुर्ततेकरीता Send Back करण्यात आलेले आहे.
स्वाधार योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण कार्यालयाद्वारे कळविण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्जाचा स्टेटस Send Back दिसत आहे, त्या विद्यार्थ्यांनी आपल्या ऑनलाईन अर्जातील त्रुटींची पुर्तता (आवश्यक कागदपत्र अपलोड) करुन अर्ज दि.15 मार्च 2026 पर्यंत कार्यालयाचे आयडीवर सादर करावे.
तसेच ज्या विद्यार्थ्यांनी वसतीगृहासाठी अर्ज सादर केलेले होते पण वसतीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांचे अर्ज स्वाधार योजनेकरीता वर्ग करण्यासाठी दि.12 मार्च 2026 अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. त्याबाबत विद्यार्थ्यांना त्यांच्या नोदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच ई-मेलवर संदेश प्राप्त झाला असल्यास त्या विद्याथ्यांनी तात्काळ स्वाधार योजनेसाठी प्रकिया पुर्ण करुन अर्ज कार्यालयाचे आयडीवर सादर करावे.
अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया या कार्यालयास भेट द्यावी किंवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 07182-234117 यावर संपर्क साधावा, असे समाज कल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी कळविले आहे.





