35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home शैक्षणिक नेट, सेटसह स्पर्धा परीक्षांसाठी पूर्णवेळ मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न – कुलगुरू...

नेट, सेटसह स्पर्धा परीक्षांसाठी पूर्णवेळ मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न – कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर

0
30

blank

-विद्यापीठ कट्टा’ उपक्रमाचे उद्घाटन
नागपूर :नेट, सेट, पेटप्रमाणेच एमपीएससी आणि युपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी पूर्णवेळ मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील दर्शनशास्त्र विभागाच्या सभागृहात ‘विद्यापीठ कट्टा’ या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या हस्ते बुधवार दि‌ ११ मार्च रोजी पार पडला. यावेळी कुलगुरू मार्गदर्शन करीत होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी भूषविले, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मानव विद्यान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, दर्शनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. धीरज कदम, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. विजय खंडाळ आणि विद्यापीठ कट्टाचे समन्वयक आकाश सेवतकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन मिळावे तसेच शैक्षणिक चर्चा व विचार मंथनासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने ‘विद्यापीठ कट्टा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाला मोठ्या स्तरावर नेण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचे कुलगुरू डॉ. क्षीरसागर पुढे बोलताना म्हणाल्या. ‘विद्यापीठ कट्टा’ हा उपक्रम विद्यार्थी हिताचा असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात विनामूल्य मार्गदर्शन मिळत आहे. या उपक्रमासाठी पूर्णवेळ सभागृह तसेच आवश्यक सोयी-सुविधा विद्यापीठाकडून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी ‘विद्यापीठ कट्टा’ या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची संधी मिळेल तसेच विविध विषयांवर बौद्धिक चर्चा घडून येतील, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासू वृत्तीला चालना मिळून संशोधनाबद्दलची आवड वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘विद्यापीठ कट्टा’ या उपक्रमाचा मुख्य उद्देश तसेच उपक्रमांतर्गत विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने, चर्चा व संवाद सत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक आकाश सेवतकर यांनी दिली.
विद्यापीठ कट्ट्याने स्क्वॉड्रन लीडर अनुज तसेच फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. विद्यापीठ कट्ट्याच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाला मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिना खान, जनसंवाद विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. मनीषा मोहोड, डॉ. प्रदीप शेंडे, सुरज शेंडे, अभिजीत तितरमारे, प्रशांत ठाकरे, पलाश करकाडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात मागील वर्षी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET), राज्य पात्रता परीक्षा (SET) तसेच संशोधन प्रवेश परीक्षा (PET) व GATE यामध्ये एकूण १९ विद्यार्थी यशस्वी झाले, यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन निलम साबु हिने केले, तर राधिका विश्वकर्मा हिने आभार मानले. गुणवंत येळणे या दिव्यांग विद्यार्थ्याचा पालकांसह सत्कार करण्यात आला. विद्यापीठ कट्टा व्हॉट्सअँप समूहावर घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन वर्गांचा लाभ घेत त्याने राज्यशास्त्र विषयातील SET परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. त्याच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओम ढोबळे, स्नेहा मेश्राम, अंकित पटले, पवन शहारे, प्रशिक जिनदे, दिक्षा, स्वाती, आतिश टेंभुर्णे, आशिष कोरे, नितीन हातझाडे, चिरंजीवी दहेकर, महेश रंगारी, अविनाश कापगते आदींनी सहकार्य केले.

blank