31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ ‘एनएनटीआर ‘मध्ये कोअर व बफर क्षेत्राचे नियंत्रण आता एकाच छताखाली

‘एनएनटीआर ‘मध्ये कोअर व बफर क्षेत्राचे नियंत्रण आता एकाच छताखाली

0
92
pressnote

blank

 गोंदिया –नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात प्रशासकीय सुसूत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘एकसंघ नियंत्रण’ प्रणाली लागू केली आहे. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली असून, या अंतर्गत येणाऱ्या १२ वनपरिक्षेत्र कार्यालयांचे उद्घाटन क्षेत्र संचालक पीयूषा जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. नवेगाव नागझिरा हा राज्यातील ६ प्रमुख व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असून, याचा विस्तार भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आहे. २०१७ मध्ये या प्रकल्पाचे बफर क्षेत्र जाहीर झाले होते. मात्र, आजवर या क्षेत्राचे व्यवस्थापन प्रादेशिक वनविभाग (गोंदिया ४१९.८९४ चौ.किमी व भंडारा ६८.५६६ चौ. किमी) आणि एफडीसीएम (१३९.५१४ चौ. किमी) अशा वेगवेगळ्या विभागाकडे होते. या विखुरलेल्या व्यवस्थापनामुळे प्रशासकीय अडचणी येत होत्या. आता शासन निर्णयानुसार सर्व बफर क्षेत्राचे नियंत्रण व्याघ्र प्रकल्पाच्या छत्राखाली आले आहे.

बफर भागातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी, स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, बफर क्षेत्रातील नागरिकांना रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया अंतर्गत प्रशासकीय सुसूत्रता आणण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.वनपरिक्षेत्र उमरझरी, तिरोडा, सडक/अर्जुनी, नागझिरा, देवरी, पिटेझरी, कोका, गडेगाव,डोंगरगाव, झांशीनगर, बोन्डे, नवेगाव पार्क येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात ‘कोअर’ आणि ‘बफर’ क्षेत्राचे एकत्रीकरण करून नव्याने तयार करण्यात आलेले ‘एकसंघ नियंत्रण’ कार्यालय १ एप्रिलपासून सुरू करण्यात आले.नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्र संचालक तथा उपवनसंरक्षक पीयूषा जगताप यांच्या हस्ते या नूतन कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. व्याघ्र प्रकल्पाचे व्यवस्थापन अधिक प्रभावी व्हावे व कोअर व बफर क्षेत्रातील समन्वयातील त्रुटी दूर व्हाव्यात, या उद्देशाने हे कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे.

blank
pressn

यावेळी गोंदिया वनविभागाचे उपवनसंरक्षक पवन जोंग,नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदियाचे उपसंचालक प्रितमसिंग कोडापे, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र नवेगावचे विभागीय वनअधिकारी अतुल देवकर,सामाजिक वनिकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी तुषार ढमढेरे,सहायक वनसंरक्षक दुर्गे, रिझवी आणि वाघ सर्व सहायक वनसंरक्षक, सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होते. एकीकडे प्रशासनाने ‘एकसंघ नियंत्रणा’साठी ही पावले उचलली असली, तरी स्थानिक स्तरावर बफर झोनच्या अंमलबजावणीवरून सध्या संतापाचे वातावरण आहे.नवीन कार्यालयामुळे वन्यजीव व्यवस्थापन सुलभ होणार असले, तरी वाढता मानव-वन्यजीव संघर्ष रोखणे आणि ग्रामस्थांच्या ‘निस्तार’ हक्कांचे रक्षण करणे, हे या नूतन कार्यालयापुढील सर्वांत मोठे आव्हान असणार आहे.

बदललेले स्वरूप आणि उद्दिष्टे
वनसंरक्षक (प्रादेशिक), नागपूर यांच्या २७ मार्च २०२६ च्या आदेशानुसार, विविध वनपरिक्षेत्रांच्या कार्यक्षेत्रात आणि मुख्यालयात बदल करण्यात आले आहेत. या नवीन प्रणालीमुळे खालील उद्दिष्टे साध्य होणार आहेतः
मानव-वन्यजीव संघर्षः व्याघ्र प्रकल्पाच्या थेट नियंत्रणामुळे वन्यप्राण्यांचा शिरकाव आणि मानवी वस्तीतील संघर्ष कमी करण्यास मदत होईल.
रोजगार संधीः बफर क्षेत्रातील स्थानिक नागरिकांसाठी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नागरिकांच्या प्रलंबित समस्यांचे तातडीने निराकरण करणे शक्य होईल. नवीन रचनेनुसार उमरझरी, तिरोडा, सडक/अर्जुनी, नागझिरा, देवरी, पिटेझरी, कोका, गडेगाव, नवेगाव पार्क, डोंगरगाव, झांशीनगर आणि बोन्डे या वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या मुख्यालयात उद्घाटन करण्यात आले.

blank