भंडारा,दि.०४- वन विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालय भंडारा अंतर्गत येणाऱ्या कक्ष क्रमांक १४३ मध्ये १९ मार्च रोजी T-27 या वाघिणीने हल्ला करून वसंत मेश्रामला ठार केले,तर २८ मार्च २०२६ रोजी माया सोनवाणे यांच्यावर वाघिणीने हल्ला केल्याने गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान मृत्यू पावल्या.या घटनेनंतर परत १ एप्रिल रोजी वाघिणीने पुन्हा श्रीमती छाया मुंगमोडे या महिलेवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याने मानव वन्यजीव संघर्षाची परिस्थिती लक्षात घेत व्याघ्र प्रकल्प विभागाच्यावतीने वाघिणीचा शोध सुरु करण्यात आलेला आहे.सोबतच जंगलालगतच्या गावात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सदर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे वन्यजीव बचाव पथक, गोंदिया वन विभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तसेच भंडारा वन विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे.वाघिणीच्या वावराच्या ठिकाणी तसेच संभाव्य प्रवेश मार्गांवर व वावर क्षेत्रात मचान व आमिष (बेट) तयार करण्यात आले असून वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी आवश्यक साधनसामग्रीसह चार प्रशिक्षित शार्प शूटर तैनात करण्यात आल्याची माहिती पत्रकाद्वारे व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने देण्यात आली आहे.
तसेच वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ५० हून अधिक कॅमेरा ट्रॅप व १० लाईव्ह कॅमेऱ्यांशिवाय, चार थर्मल ड्रोनच्या सहाय्याने जंगल परिसरात दिवस-रात्र शोध मोहीम राबविण्यात येत आहे.वाघिणीचे दररोज चे असित्व/वावर क्षेत्राची माहिती ची वनविभागास मिळत असून वन विभागामार्फत वाघिणीला जेरबंद करण्याचे प्रयत्न अधिक तीव्र करण्यात आले असून लवकरच संबंधित वाघिणीला जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास नवेगाव-नागझिरा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने व्यक्त केला असून स्थानिक नागरिकांनी वनविभागास सदर वाघिणीचे जेरबंद करण्याच्या अनुषंगाने प्रशासनास सहकार्य करावे, असे जाहीर आव्हान करण्यात येत आहे





