नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी सोशल मीडियावर खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल रोजी रात्री उशिरा दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ७८(१)(ii) व ३५६(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
तक्रारदार निखिल रामचंद्र इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील फेसबुक प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये रामेश्वर दरेकर यांनी महसूल मंत्री बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर ११४७ एकर जमीन असल्याचा दावा केला होता. हा व्हिडिओ ३१ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.
दरम्यान, या दाव्यामुळे समाजात चुकीचा संदेश पसरून बावनकुळे कुटुंबाची बदनामी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तहसीलदार, कामठी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत प्रमाणपत्रानुसार चंद्रशेखर बावनकुळे व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर एकूण सुमारे २८.४४ एकर जमीन नोंद असून ती विविध गावे व सर्वे क्रमांकांमध्ये आहे. त्यामुळे ११४७ एकरचा दावा पूर्णपणे खोटा व दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोराडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहेत.





