सडक अर्जुनी,दि.०५- जिल्हा परिषद व प्राथमिक शाळा जांभळी येथील विद्यार्थ्यांनी नुकतीच प्रदीप कापगते यांच्या कलिंगड पिकाच्या शेताला शैक्षणिक भेट देत प्रत्यक्ष शेतीविषयक ज्ञान आत्मसात केले. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना आधुनिक शेती पद्धती, पीक व्यवस्थापन आणि कृषी क्षेत्रातील संधी यांची माहिती करून देणे हा होता.
शेतभेटीदरम्यान शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना कलिंगड लागवडीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. बियाणे निवड, जमिनीची मशागत, पाणी व्यवस्थापन, खतांचा वापर तसेच कीड व रोग नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन कलिंगड पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून विविध प्रश्न विचारले.
शेतकरी प्रदीप कापगते यांनी सर्व शालेय विद्यार्थ्यांना मनसोक्त कलिंगड चा आस्वाद घ्यायला दिला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभव मिळाला. शेतीबाबतची आवड निर्माण होण्यास आणि भविष्यात कृषी क्षेत्राकडे वळण्यास ही भेट उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्याध्यापक किशोर डोंगरवार यांनी व्यक्त केला.
या शैक्षणिक सहलीचे आयोजन शाळेचे किशोर डोंगरवार मुख्याध्यापक, बि आर बागडे, डी पी साखरे, श्यामा कुंडगिर , माया तांदडे , जितेंद्र कवरे या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शेतकऱ्यांचे आभार मानले.





