वाशिम, दि.१2 एप्रिल -)जिल्हा गॅझेटिअर हा ज्ञानकोश सदृश्य ग्रंथ असून त्यामध्ये जिल्ह्याचा भूगोल, अर्थव्यवस्था च विकास, प्रशासन, लोक व त्यांची संस्कृती, सामाजिक सेवा व संस्था तसेच प्रेक्षणीय स्थळांची सखोल माहिती दिलेली असते. दर्शनिका विभागाद्वारे गॅझेटिअरचे काम हाती घेतले आहे.जिल्हा गॅझेटियर हा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा, इतिहासाचा आणि सांस्कृतिक वारशाचा आरसा असून त्यामध्ये अचूक, अद्ययावत व विश्वासार्ह माहितीचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे.जिल्ह्याची जमेची बाजू ओळखून गॅझेटियर अद्ययावत प्रक्रियेला गती द्यावी असे प्रतिपादन मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले.जिल्हा गॅझेटियरच्या अद्ययावत प्रक्रियेचा आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संजय राठोड यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी डॉ.श्री. कुलकर्णी यांनी विविध विभागांकडून संकलित करण्यात येणाऱ्या माहितीच्या प्रत्येक घटकात ताज्या आणि प्रमाणित संदर्भांचा समावेश करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
वत्सगुल्मच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करा; लोप होऊ नये यासाठी सर्वांगीण प्रयत्न आवश्यक
जिल्ह्याला वत्सगुल्म राज्याचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला असून तो लोप पावू नये यासाठी सर्वांगीण प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे, ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी पुरातत्त्वीय स्थळांचे संवर्धन, ऐतिहासिक नोंदींचे दस्तऐवजीकरण, तसेच स्थानिक सांस्कृतिक परंपरांचे जतन यावर विशेष भर देण्याच्या सूचना डॉ.कुलकर्णी यांनी दिल्या.
गॅझेटियरमध्ये जिल्ह्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक पैलूंचा व्यापक आढावा समाविष्ट करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.तसेच, माहिती सादरीकरण करताना सुसंगतता आणि स्पष्टता राखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गॅझेटियर हे केवळ शासकीय दस्तऐवज नसून संशोधक, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरते, त्यामुळे त्याची मांडणी दर्जेदार व उपयोगी असावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गॅझेटियर डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी गॅझेटियर तयार करण्याच्या अनुषंगाने माहिती देत, निर्धारित कालमर्यादेत दर्जेदार गॅझेटियरसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.





