
: याच महिन्यात निधी उपलब्ध होणार, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
गोंदिया : शहरातील रेलटोली परिसरातील निर्माणाधीन सांस्कृतिक नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदिया नगर परिषदेला १४ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. तसेच हा निधी एप्रिल महिन्यातच उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे नाट्यगृहाच्या रखडलेल्या बांधकामाला आता गती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गोंदिया शहरातील नाट्यगृहाचे बांधकाम निधीअभावी रखडले होते. याची दखल घेत माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यासाठी पाठपुरावा केला. तसेच नगर परिषदेच्या माध्यमातूनही यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याचीच दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्माणाधीन सांस्कृतिक नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्यासाठी १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन तो निधी याच महिन्यात उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रधान सचिव नगरविकास व प्रधान सचिव वित्त विभाग यांना तात्काळ निधी वितरणाचे आदेश असल्याने आता हे भव्य वास्तू लवकर पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरातील हे नाट्यगृह माजी आ .गोपालदास अग्रवाल यांच्या कार्यकाळातील प्रमुख प्रकल्पांपैकी एक होय. गुजराती शाळेजवळील रेलटोली येथील जिल्हा परिषदेची जागा निःशुल्क नगर परिषदेला उपलब्ध करून दिली. त्यांनी राज्य सरकारकडून आधुनिक नाट्यगृहाचे बांधकाम मंजूर करून घेतले असून, सध्या काम अंतिम टप्प्यात आहे.
सन २०१४ पासून रखडले होते नाट्यगृहाचे बांधकाम
नाट्यगृह पूर्णपणे वातानुकूलित राहणार आहे. त्याच्या विद्युत, देखभाल खर्चासाठी नगरपरिषद शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम मंजूर करून घेतले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमसारखे डिझाइन देशविख्यात वास्तुकार शशी प्रभू यांनी तयार केले असून, १००० दर्शक क्षमता व ३० हून अधिक दुकानांचा समावेश आहे. २०१४ नंतर राजकीय बदलांमुळे
निधीअभावी कामाची गती मंदावली, ज्यामुळे खर्च वाढला तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे अतिरिक्त निधी आवश्यक झाला. माजी आ.गोपालदास अग्रवाल यांच्या विनंतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ १४ कोटी निधी देण्याचे निर्देश दिले आहेत.




