अर्जुनी-मोरगाव-विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी आणि सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी माजी मंत्री व आमदार राजकुमार बडोले यांनी नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांची भेट घेतली. याप्रसंगी बडोले यांनी मतदारसंघातील समस्यांचा पाढा वाचला आणि तातडीने ‘विशेष आढावा सभा’ घेण्याची मागणी केली.
या भेटीत बडोले यांनी, सुरजागड (जि. गडचिरोली) येथे उपलब्ध असलेल्या लोहखनिजाचा उपयोग करून अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठे औद्योगिक प्रकल्प उभारता येतील अशी दूरदृष्टी मांडली. यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून दिल्यास तालुक्यात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सुचविले. तसेच मका उत्पादकांसाठी तातडीने खरेदी केंद्र सुरू करावी, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली झासीनगर उपसा सिंचन योजना तातडीने मार्गी लावावी, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई निवारणासाठी ठोस उपाययोजना कराव्या, निसर्गसंपन्न अर्जुनी-मोरगाव तालुक्याचा पर्यटनदृष्ट्या झपाट्याने विकास व्हावा, यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नवेगावबांध परिसरातील पर्यटन क्षमता ओळखून जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर बडोले यांनी भर दिला. यावर जिल्हाधिकारी डॉ. गोंदावले यांनी, अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रासाठी लवकरच विशेष आढावा सभा आयोजित करण्याचे आश्वासन दिले. शिक्षण, आरोग्य, सिंचन, मत्स्य व्यवसाय आणि तीर्थक्षेत्र विकासाबाबत प्रशासन सकारात्मक पावले उचलेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अविनाश काशीवार, जि. प. सदस्य जगदीश बावनथळे, पं. स. सदस्य होमराज पुस्तोळे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे आदी उपस्थित होते.





