अर्जुनी/मोरगाव- तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेले साखळी उपोषण १३ व्या दिवशीही सुरूच असून आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळाल्याने हा प्रश्न अधिकच ऐरणीवर आला आहे. धानाला बोनस देणे, थकीत चुकारे तात्काळ अदा करणे, धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविणे यांसह एकूण १४ मागण्यांसाठी अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने १५ एप्रिलपासून हे आंदोलन सुरू आहे. मात्र शासन व प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
२७ एप्रिल रोजी अर्जुनी/मोरगाव दौऱ्यावर आलेले भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे,आमदार नानाभाऊ पटोले,तसेच माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या मागण्या योग्य असल्याचे सांगत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यानंतर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी शेतकरी प्रश्नांवर आढावा बैठक घेत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. या बैठकीस आमदार नानाभाऊ पटोले, माजी आमदार दिलीप बन्सोड, जिल्हा मार्केटिंग व पणन विभागाचे अधिकारी, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे तसेच विविध विभागांचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत धान उत्पादकांचे प्रलंबित चुकारे, धान खरेदीवरील मर्यादा, मका खरेदी प्रक्रिया आणि उन्हाळी धान खरेदी यांसारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच वनहक्क पट्टाधारक शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करून त्यांना खरेदी प्रक्रियेत समाविष्ट करण्याबाबत निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने समन्वय साधून तात्काळ कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश खासदार पडोळे यांनी दिले.एकीकडे शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र होत असताना दुसरीकडे राजकीय हालचाली वाढल्याने अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील शेतकरी प्रश्न लवकरच निर्णायक टप्प्यावर पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र शासनाकडून प्रत्यक्षात कोणती कार्यवाही केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





