गोंदिया : नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग अंतर्गत नागपूर येथे आयोजित विभागीय कार्यशाळेत परसोडी रैय्यत येथील प्रयोगशील शेतकरी देवराम कोरे यांचा नैसर्गिक शेतीतील उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल परिसरात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे सन २०२६-२७ साठी नागपूर येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात या भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे कृषी, वित्त व नियोजन राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील कुलगुरू डॉ. शरद गडाख होते. तर शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे तसेच विभागीय कृषी सहसंचालक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यशाळेत नैसर्गिक शेतीचे महत्त्व, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि उत्पादनवाढीच्या विविध बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. देवराम कोरे यांनी आपल्या शेतात रासायनिक खतांचा पूर्णपणे त्याग करून नैसर्गिक पद्धतीने शेती करत यशस्वी प्रयोग साकारला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण भागातील शेतकरी असूनही नैसर्गिक शेतीचा घेतलेला ध्यास इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला नागपूर विभागातील मोठ्या संख्येने शेतकरी व कृषी अधिकारी उपस्थित होते. देवराम कोरे यांच्या या सन्मानामुळे नवेगावबांध परिसरात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





