
; अंबाजोगाई न्यायालयाचा निकाल
अंबाजोगाई: येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एका महत्त्वाच्या निकालात धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपी भास्कर किसन शिंदे याला सहा महिने कारावास आणि ११ लाख ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्यासोबत ऊसतोड वाहतुकीचा करार करून उचल घेतलेली रक्कम परत न केल्याने कारखान्याने कायदेशीर लढाई लढली होती. फिर्यादी कारखान्याच्या वतीने ॲड. प्रवीण योगीराज मेटे यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, माजलगाव तालुक्यातील रहिवासी असलेला आरोपी भास्कर किसन शिंदे हा ट्रक मालक असून त्याने अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्यासोबत २०११-१२ च्या गळीत हंगामासाठी ऊसतोड वाहतूक करण्याचा करार केला होता. करारानुसार त्याने कारखान्याकडून ५ लाख रुपये उचल घेतली होती. मात्र, करारानुसार पूर्ण हंगामात ऊस पुरवठा न केल्यामुळे कारखान्याने व्याजासह ६ लाख ५७ हजार ५०० रुपयांची मागणी केली. ही देणी फेडण्यासाठी आरोपीने अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा धनादेश दिला होता.
हा धनादेश बँकेत जमा केला असता आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो १३ डिसेंबर २०१३ रोजी परत आला. कारखान्याने विधीज्ञांमार्फत कायदेशीर नोटीस पाठवूनही आरोपीने रक्कम अदा न केल्याने अखेर न्यायालयात धाव घेण्यात आली. या खटल्यामध्ये कारखान्याच्या वतीने लालासाहेब इंगळे आणि गोवर्धन पवार यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. न्यायालयाने सर्व पुरावे आणि ॲड. प्रवीण योगीराज मेटे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरवले. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त १५ दिवस कारावास भोगावा लागणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.





