26.2 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home गुन्हेवार्ता मुलाच्या लग्नाच्या दिवशीच वरपित्याचा अपघाती मृत्यू

मुलाच्या लग्नाच्या दिवशीच वरपित्याचा अपघाती मृत्यू

0
150

शोकमग्न वातावरणात मुलाचे लग्न; मुलीचा विवाह पुढे ढकलला : वधू – वर पक्षावर शोककळा
बुलढाणा-मुलाचे शनिवार ९ मे, तर मुलीचे लग्न १० मे रोजी आयोजित केले. विवाह सोहळ्याची तयारी आनंदात झाली होती. मात्र, शनिवारची पहाट वधू आणि वराकडील मंडळीवर आघात करणारी ठरली. मुलाच्या लग्नाच्या दिवशीच वरपित्यावर काळाने घाला घातला. अपघातात नवरदेवाच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आनंदी वातावरण क्षणात अतीव दुःखात बदलले. अशा शोकाकुल वातावरणातच मुलाचा विवाह साध्या पद्धतीने मलकापूर येथे पार पडला. तर मुलीचे आज रविवारचे नियोजित लग्न पुढे ढकलण्यात आले.
पंढरी त्र्यंबक बगाडे (वय ५३) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. नांदुरा तालुक्यातील कोलासर येथील ते रहिवासी होते. मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा तालुक्यातील कोलासर फाट्यावर ९ मे रोजी पहाटे ०५.४५ वाजेपूर्वी एमएच – २८ – बीयू – ७६०५ क्रमांकाच्या होंडा युनिकॉर्न या दुचाकीने धडक दिल्याने पंढरी बागडे यांचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीवरील दोघेदेखील जखमी झाले.
पंढरी बगाडे व मलकापूर येथील प्रल्हाद रामकृष्ण तायडे यांच्या कुटुंबात एक मुलगी द्यायची आणि एक मुलगी करून आणायची अर्थात लग्नाचे साटेलोटे (आपापसात) ठरविण्यात आले. बगाडे यांचा मुलगा गोपालचा विवाह तायडे यांची मुलगी श्रद्धा हिच्याशी ९ मे रोजी आयोजित केला होता. तसेच बगाडेंची मुलगी गीताचे लग्न तायडे यांचा मुलगा सागरसोबत १० मी रोजी लागणार होते. लग्नाची सर्व तयारी झाली होती. मात्र, आज पहाटे त्र्यंबक यांचा अपघाती मृत्यू झाल्याने वधू – वर पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळला.आज मलकापूर येथे मुलाच्या लग्नाची वेळ दुपारी साडेबाराची होती. सात, आठ तासांचा अवधी बाकी असतानाच दुर्दैवी घटनेने बगाडे व तायडे कुटुंब स्तब्ध झाले. एकाच कुटुंबात मुलगा आणि मुलीचे लग्न असताना अशा दुःखाच्या सावटात नेमके काय करावे, असा दुःखद पेच उद्भवला. दरम्यान, काही मंडळींनी पुढाकार घेत मुलाचे लग्न साध्या पद्धतीने लावून घेतले. तर आज मुलीचे लागणारे लग्न पुढे लोटल्याची माहिती मिळाली.मृत पंढरी यांचे मुला, मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकून आशीर्वाद देण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

blank