गोंदिया : ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या चळवळीत एक मानाचा तुरा खोवला असून, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (सन २०२५-२६) अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा’ निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये तांडा ग्रामपंचायतीने उत्कृष्ट शौचालय व्यवस्थापनाचा मानाचा ‘स्व. आबासाहेब खेडकर जिल्हास्तरीय विशेष पुरस्कार’ पटकावला असून, याअंतर्गत गावाला ५० हजार रुपयांची सन्मान राशी प्राप्त झाली आहे.
शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत गावोगावी स्वच्छतेची चळवळ उभी राहावी यासाठी दरवर्षी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविले जाते. यावर्षी २०२५-२६ च्या स्पर्धेत तांडा गावाने हिरिरीने सहभाग घेतला
होता. गावात १०० टक्के हागणदारीमुक्ती टिकवून ठेवणे, शौचालयांचा नियमित वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यावर ग्रामपंचायतीने विशेष भर दिला होता. या उत्कृष्ट ‘शौचालय व्यवस्थापन गुणवत्तेची’ दखल घेत जिल्हास्तरीय समितीने तांडा गावाची या विशेष पुरस्कारासाठी निवड केली आहे. हे यश केवळ एका व्यक्तीचे नसून संपूर्ण गावाची एकजूट आणि लोकसहभागाचे फळ आहे. या अभियानात गावातील सर्व ग्रामस्थ, नागरिक, ग्रामपंचायतीचे विद्यमान पदाधिकारी, विविध समित्यांचे सदस्य आणि ग्रामस्तरावरील सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.यामध्ये गावातील महिलांची आणि महिला ग्रामसंघाचे बचत गट सदस्य व पदाधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली, ज्यांनी घरोघरी जाऊन स्वच्छतेबाबत जनजागृती केली
आणि शौचालय व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून दिले. जिल्हास्तरावरील या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर तांडा गावाने मोहोर उमटवल्यामुळे संपूर्ण तालुक्यात गावाचे नाव उंचावले असून, सध्या गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत कार्यालयातर्फे या यशाचे श्रेय सर्व गावकऱ्यांना देण्यात आले असून, पदाधिकारी आणि प्रशासनाने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून अभिनंदन केले आहे.





