
गोंदिया : दारू पिण्यासाठी पैसे देत नसून उलट शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचा राग मनात धरून ढाब्यातील नोकरानेच ढाबा मालक राजकुमार मदनलाल हरिणखेडे (४७, वॉर्ड क्रमांक-३, रावणवाडी) यांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी (दि.२१) दुपारी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने खुनाची कबुली दिली आहे.
सविस्तर असे की, रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत बोपचे पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या महाजन ढाब्याचे मालक राजकुमार हरिणखेडे यांना मंगळवारी (दि.१९) रात्री ९:०० वाजता ते बुधवारी (दि.२०) सकाळी ६:०० वाजता दरम्यान धारदार हत्याराने डोक्यावर व गळ्यावर मारून ठार केले होते. याबाबत बुधवारी त्यांची पत्नी दुर्गा राजकुमार हरिणखेडे (४०) यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी अपराध क्रमांक २७८/२०२५ कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिताअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ढाब्यातील नोकर महेश प्रकाश नेवारे (२२, रा.मुरपार) याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची माहिती काढली.महेशच्या मनात राजकुमार यांच्याबद्दल चांगलाच राग होता व त्यातच मंगळवारी ते ढाब्यातच झोपणार असल्याने त्याला आयती संधी मिळाली होती. राजकुमार रात्री ढाब्यात झोपलेले असताना महेशने त्यांच्या डोक्यावर तसेच धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून ठार केले.
तसेच त्याला गुरुवारी (दि.२१) दुपारी मुरपार येथून ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.मात्र, विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. पथकाने त्याला पुढील कारवाईसाठी रावणवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.





