
गोंदिया,दि.२५-अर्जुनीमोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी येथे दोन अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत १६ वर्षीय विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेऊन त्याला बाल न्यायालयात हजर केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ मे रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास घडली. घराशेजारी राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना खेळण्याच्या बहाण्याने घरी बोलावले.संबंधित मुलीपैकी एकीचे वय अवघे सहा वर्ष नऊ महिने, तर दुसरीचे वय दहा वर्ष आठ महिने असल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर मुलींना कोणालाही माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप आहे. त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर मानले जात आहे. घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोरगाव पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून संबंधित विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील कार्यवाहीसाठी त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या दोन्ही मुलींवर घरामध्ये अत्याचार झाल्याचा आरोप असून, यातील एक मुलगी ही आरोपीची चुलत बहीण असल्याचेही समोर आले आहे. तसेच तिच्यावर मागील काही दिवसांपासूनही अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.





