
गोंदिया : तिकीटाशिवाय आणि अनियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई व जागृकता निर्माण करण्याच्या अनुषंगाने गोंदिया रेल्वे स्थानकावर दक्षिण पूर्व मध्ये रेल्वे नागपूर विभागाच्या वतीने २ जून रोजी तिकीट नाका तपासणी मोहिम राबविण्यात आली. दरम्यान १८ गाड्यांची कसून तपासणी करून ४२३ प्रकरणात २ लाख १२ हजार ८३० रुपया दंडाची वसूली करण्यात आली.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत गोंदिया स्थानकावर २ जून रोजी एक विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. तिकीटविरहित प्रवासाला आळा घालणे आणि रेल्वेच्या नियमांविषयी प्रवाशांमध्ये जागरूकता वाढवणे हा या मोहिमेचा उद्देश होता. या मोहिमेदरम्यान एकूण १८ गाड्यांची कसून तपासणी करण्यात आली. तपासणी नाक्यांवर तिकीटाशिवाय आणि अनियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. ज्यामुळे विविध श्रेणींतील ४२३ प्रकरणांमध्ये एकूण २,१२,८३० रुपयांची वसुली झाली. दरम्यान, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, दिलीप सिंग यांनी सांगितले, ‘तिकिटाशिवाय प्रवास आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील प्रवाशांना रेल्वे परिसरात स्वच्छता राखण्याची आणि धूम्रपानासारख्या प्रतिबंधित गोष्टी टाळण्याची विनंती करण्यात येत आहे. तर नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांनी या मोहिमेचे कौतुक करताना सांगितले, ‘अशा विशेष तिकीट तपासणी मोहिमा प्रवाशांमध्ये शिस्त रुजवण्यात आणि रेल्वेच्या महसुलाची सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रवाशांनी नेहमी वैध तिकिटासह प्रवास करावा.तिकीट विरहित प्रवासाच्या २०३ प्रकरणांमध्ये १ लाख ४१ हजार ३३५ रुपये, अनियमित प्रवासाच्या १२७प्रकरणांमध्ये ६१ हजार ८९५ रुपये, नोंद न केलेल्या सामानाच्या ८६ प्रकरणांमध्ये ८ हजार ६०० रुपये, कचरा टाकण्याच्या ४ प्रकरणांमध्ये ४०० रुपये, धूम्रपानाच्या ३ प्रकरणांमध्ये ६०० अशा एकूण कारवाई २ लाख १२ हजार ८३० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.
यांनी केली कारवाई या विशेष मोहिमेत वाणिज्य विभाग आणि रेल्वे संरक्षण दलाने संयुक्तपणे सहभाग घेतला. या मोहिमेतील एकूण सहभाग कर्मचारी खालीलप्रमाणे होता. सहायक वाणिज्य व्यवस्थापक अरविंद सॉ यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. ज्यात मुख्य वाणिज्य निरीक्षक २, मुख्य तिकीट निरीक्षक ९, प्रवासी तिकीट परीक्षक १८, बहु-कार्यकारी कर्मचारी-३ आणि रेल्वे संरक्षण दल – २ यांचा समावेश होता.





