40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ ‘भ्रष्टाचाराचे आरोप निराधार’; गंगाझरी ग्रामपंचायतीचा पत्रकार परिषदेत पलटवार

‘भ्रष्टाचाराचे आरोप निराधार’; गंगाझरी ग्रामपंचायतीचा पत्रकार परिषदेत पलटवार

0
12

blank

गोंदिया : तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत गंगाझरी येथे २५ मे २०२६ रोजी काहीनी पत्रकार परिषद घेऊन ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा माजी सरपंच सोनुभाऊ विनायक घरडे आणि ग्रामपंचायत अधिकारी डी. के. महाकाळकर यांच्यावर विविध आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांवर आता प्रशासक सोनु घरडे यांनी सविस्तर खुलासा करत सर्व आरोपांना निराधार, दिशाभूल करणारे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोपांमध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र तक्रारदारांनीच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रकमा सांगितल्याने त्यांच्या आरोपांतील विसंगती उघड झाल्याचा दावा घरडे यांनी केला आहे. लेखी तक्रारीत तीन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे नमूद करण्यात आले, तर काहींनी एक कोटी रुपये आणि इतरांनी सत्तर ते ऐंशी लाख रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केल्याने ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाच्या नियमांनुसार ई-निविदा, दरपत्रक अथवा GeM पोर्टलद्वारे खरेदी करण्याची तरतूद असून सर्व खरेदी नियमानुसार करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. यु.के. इलेक्ट्रिकलच्या नावाने विविध तारखांना ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याचे कागदोपत्री पुरावे उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले.
आदिवासी सांस्कृतिक भवनाच्या बांधकामासंदर्भात यापूर्वी प्राथमिक चौकशी झालेली असून संबंधित कामासाठी प्राप्त निधी व देयकांची सर्व नोंद ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. तसेच मूळ कागदपत्रांची मागणी जिल्हा परिषदेकडे करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

ग्रामपंचायत इमारत दुरुस्तीचे काम मासिक सभेतील सर्वानुमते मंजूर ठरावानंतरच करण्यात आले असून त्यासाठी आवश्यक प्रशासकीय आणि आर्थिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्याचप्रमाणे वृक्षारोपण व ट्रि-गार्ड खरेदीबाबतही सर्व खर्च शासनाच्या विविध योजनांतर्गत नियमांनुसार झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. “एक पेड माँ के नाम” अभियानांतर्गत १२०० झाडांची लागवड करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.शासकीय जागा विक्री केल्याच्या आरोपांनाही घरडे यांनी फेटाळून लावले. भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविणे, अतिक्रमण रोखणे आणि स्थानिक रोजगार निर्मिती करणे या उद्देशाने शासनाच्या धोरणांनुसार कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

ग्रामपंचायत अधिकारी डी. के. महाकाळकर यांच्यावर लावण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोपही पूर्णपणे खोटे असल्याचा दावा करण्यात आला. त्यांना आर्थिक अधिकार ग्रामपंचायतीच्या ठरावाद्वारे देण्यात आले असून त्यांच्या विरोधातील आरोपांना कोणताही वस्तुनिष्ठ आधार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.यावेळी घरडे यांनी आरोप करणाऱ्या काही व्यक्तींवरही गंभीर आरोप केले. काही तक्रारदारांनी शासकीय जागांवर अतिक्रमण, अवैध बांधकामे, शासकीय जमिनीवरील बेकायदेशीर वापर आणि ग्रामपंचायतीवर दबाव टाकण्याचे प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला. ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता नियमबाह्य कामांना मंजुरी दिली नसल्यामुळेच सूडबुद्धीने आरोप करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले.ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोपही फेटाळण्यात आला. सर्व बैठकींचे उपस्थिती रजिस्टर, स्वाक्षऱ्या आणि जीपीएस छायाचित्रे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

मागील पाच वर्षांत ग्रामपंचायतीमार्फत अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली असून कार्यकाळ संपल्यानंतर अचानक करण्यात आलेले आरोप हे आगामी ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केल्याचा आरोप घरडे यांनी केला.ग्रामपंचायतीची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही व्यक्तींनी संगनमताने हे षड्यंत्र रचल्याचा आरोप करत संबंधितांविरुद्ध गंगाझरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून मानहानीचे दावेही न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासक सोनु विनायक घरडे यांनी दिली.

“ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये पारदर्शकता ठेवून शासनाच्या नियमांनुसार काम करण्यात आले आहे. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थिती जाणून घ्यावी,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

blank