
गोंदिया:- ‘सायकल चलाओ पर्यावरण बचाओ’ आणि ‘सायकल चलाओ सेहत बनाव’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडत जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने गोंदिया शहरात आज भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. गोंदिया सायकलिंग संडे या ग्रुपद्वारे आयोजित या रॅलीत 8 वर्षांच्या चिमुकल्यापासून ते 85 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील सायकलप्रेमींनी उत्साहात सहभाग नोंदवला. या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे गोंदिया नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन शेंडे आणि गोंदिया शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर पर्वते यांनी स्वतः सायकल चालवून सहभाग घेतला. जयस्तंभ चौकातून सुरू झालेल्या या रॅलीला तहसीलदार समशेर पठाण आणि पोलिस निरीक्षक नागेश भास्कर यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. शहरातील मुख्य मार्गावरून सुमारे 5 किलोमीटर अंतर कापत ही रॅली इंदिरा गांधी स्टेडियमवर समाप्त झाली.
‘सायकल चालवा, प्रदूषण टाळा’ आणि ‘फिट इंडिया, हिट इंडिया’ अशा घोषणा देत सायकलस्वारांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. रॅलीमध्ये डॉक्टर, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, पोलीस कर्मचारी आणि सरकारी अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समारोप प्रसंगी सहभागी सर्व सायकलस्वारांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना नगराध्यक्ष सचिन शेंडे म्हणाले, “सायकल हे पर्यावरणपूरक वाहन असून आरोग्यासाठीही अत्यंत उत्तम आहे. प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस सायकल चालवावी.” गोंदिया सायकलिंग संडे या ग्रुपद्वारे गेल्या 9 वर्षांपासून दर रविवारी सायकलिंगच्या माध्यमातून पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला जात आहे. आजच्या रॅलीत 500 हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून दिलेला हा संदेश शहरवासियांसाठी प्रेरणादायी ठरला.
बॉक्स
वाहतूक विभागाकडून सायकलींना लावण्यात आले रेडियम
या सायकल रॅली सुरू होण्याआधी वाहतूक पोलीस विभागाकडून सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक सायकल ला लाल व पांढऱ्या रंगाचे रेडियम लावण्यात आले कारण की अंधारात सायकल चालत असताना येणाऱ्या वाहनाला हा रेडियम धारा सायकलिस्ट समोर असल्याचे दिसल्या पाहिजे व अपघात होऊ नये यासाठी हे रेडियम वाहतूक विभागाकडून लावण्यात आले.





