
भूमिगत गटार योजना नागरिकांच्या जीवावर
रामनगर ते सूर्याटोला मार्गाची दुरावस्था
गोंदिया : शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पीसी स्नेहल कंस्ट्रक्शन कंपनीकडून सध्या भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. मात्र, या कंपनीच्या अत्यंत सुस्त आणि हलगर्जी कारभारामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रामनगर ते सूर्याटोला या महत्त्वाच्या मार्गावर मागील दोन महिन्यांपूर्वी रस्ता खोदून पाईपलाईन तर टाकण्यात आली, मात्र त्यानंतर हा रस्ता पूर्ववत न केल्याने हा मार्ग आता अपघाताचा सापळा बनला आहे.ही स्थिती शहरातील इतर प्रभागातही दिसून येत असल्याने भूमिगत गटार योजना नागरिकांच्या जीवावर उठली आहे.
मागील ४ ते ५ वर्षापासून शहरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. त्यातच रामनगर परिसरात दोन महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात या मार्गावर खोदकाम करण्यात आले. पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदार कंपनीने खोदलेला रस्ता व्यवस्थित बुजवला नाही आणि त्याचे सिमेंटीकरणही केले नाही. रस्ता तसाच खड्डेमय आणि अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आला आहे.रामनगर परिसर हा शहरातील गजबजलेल्या मार्गांपैकी एक असून, येथून दररोज हजारो नागरिक आणि वाहनधारकांची ये-जा असते. रस्ता खोदल्यामुळे आणि तिथे पसरलेल्या माती-धुळीमुळे वाहनधारकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. खराब रस्त्यामुळे या मार्गावर अनेक दुचाकीस्वार घसरून पडले असून, काही नागरिकांना गंभीर दुखापतही झाली आहे. या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये कंत्राटदार कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाविरुद्ध तीव्र असंतोष पसरला आहे. तर दुसरीकडे येत्या काही दिवसातच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. रामनगर, सूर्याटोलासह शहरातील इतर महत्वाच्या रस्त्यावरही हा प्रकार दिसून येत असल्याने अपघाताच्या मालिकेत पुन्हा वाढ होणार आहे. तेव्हा जे महत्वपूर्ण व वाहतुकीचे रस्ते आहेत. त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
….
दोन महिने झाले रस्ता खोदून ठेवला आहे. पाईप लाईन टाकली पण रस्ता नीट बुजवला नाही की त्यावर सिमेंट रोड केला नाही. रात्रीच्या वेळी तर इथे प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. कंत्राटदार कंपनी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे का?’
— बाबा खापेकर, सूर्याटोला
अन्यथा आंदोलन !
नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पीसी स्नेहल कंस्ट्रक्शन कंपनीच्या व्यवस्थापनाकडून किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांकडून याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. संबंधित लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकार्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून कंत्राटदाराला रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सूर्याटोला आणि रामनगर परिसरातील नागरिकांनी दिला आहे.




