38.2 C
Gondiā
Thursday, June 11, 2026
Home विदर्भ देसाईगंज नगर भूमापन लालफितीशाहीत अडकले; ८ वर्षे उलटूनही नागरिक सनदेच्या प्रतीक्षेत

देसाईगंज नगर भूमापन लालफितीशाहीत अडकले; ८ वर्षे उलटूनही नागरिक सनदेच्या प्रतीक्षेत

0
16

blank

भूमी अभिलेख विभागाविरोधात संताप

देसाईगंज ( डॉ विष्णू वैरागडे)-शहराचा विकास आणि नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचा हक्क मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेला देसाईगंज शहराचा नगर भूमापन कार्यक्रम आता प्रशासकीय अनास्थेचा बळी ठरला आहे. १८ महिन्यांचा हा कालबद्ध कार्यक्रम तब्बल ८ वर्षे २ महिने उलटूनही अपूर्णच आहे. यामुळे देसाईगंजवासीयांना अद्याप मालमत्ता सनद मिळालेली नाही. परिणामी, नागरिकांमध्ये भूमी अभिलेख विभागाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

गाजावाजा ठरला फोल

तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते ९ एप्रिल २०१८ रोजी मोठ्या गाजावाजात या नगर भूमापन योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते. हा प्रकल्प १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, आज आठ वर्षांनंतरही हा प्रकल्प लालफितीशाहीत अडकून पडला आहे.

कोट्यवधींचा निधी देऊनही काम ठप्प

या नगर भूमापनासाठी भूमी अभिलेख विभागाला ३ कोटी ४६ लाख ५८ हजार ६२५ रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले होते. यापैकी २ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी ६ जुलै २०१८ ते १९ डिसेंबर २०१८ या कालावधीत तीन टप्प्यांत भूमी अभिलेख विभागाला अदा देखील करण्यात आला. निधी मिळूनही काम रेंगाळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मंत्र्यांसमोर दिलेले १०० दिवसांचे आश्वासन हवेत विरले

राज्यभरात ड्रोनद्वारे झपाट्याने मोजणी करून सनद वाटप सुरू आहे. महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी राबवलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना’ अंतर्गत १९ सप्टेंबर २०२५ रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात देसाईगंज नगर भूमापनाचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी भूमी अभिलेख विभागाने १०० दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम आखून नागरिकांना सनद वाटप करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासनही हवेतच विरले असून प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे.एकीकडे शासन गतिमान प्रशासनाचा दावा करत असताना, देसाईगंजमधील नागरिक मात्र आपल्याच हक्काच्या मालमत्ता पत्रकासाठी (सनद) वर्षानुवर्षे सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. या विलंबासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून तात्काळ सनद वाटप करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

मला याबाबत माहिती नाही, सध्या स्थिती काय आहे याची माहिती घेतो-~श्री लालसिंग मिसाळ, उप संचालक, भुमी अभिलेख नागपूर विभाग

संपूर्ण मिळकतीच्या चौकश्या पुर्ण झाले आहे फक्त लेआऊट टाकायचे बाकी राहिले आहे.जवळपास दोन महिन्यांत पुर्ण होईल, देसाईगंज येथील भुमी अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक मुकेश सेलोकर हे प्रतिनियुक्तीवर असल्याने काम थांबले आहे.~श्री विजय भालेराव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय गडचिरोली