38.2 C
Gondiā
Thursday, June 11, 2026
Home विदर्भ धान खरेदीच्या उद्दिष्टात वाढ;भंडारा,गोंदियासह अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ

धान खरेदीच्या उद्दिष्टात वाढ;भंडारा,गोंदियासह अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ

0
15

blank

आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुराव्याला यश 

नागपूर : राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याबाबत आदेश राज्य सहकारी पणन महासंघाला दिले आहेत. आमदार डॉ. परिणय फुके यांनी याबाबत अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून धान उत्पादक भंडारा, गोंदिया जिल्ह्यासह इतर धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.

आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीचे उद्दिष्ट ५० लाख क्विंटलपर्यंत वाढवून देण्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत मे महिन्यात पत्र देऊन चर्चा केली होती. भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान उत्पादन होते. उन्हाळी धानासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याने धान खरेदीचे उद्दिष्ट कमी पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना धान खरेदी योजनेचा लाभ देण्यासाठी उद्दिष्ट ५० लाख क्विंटल करण्याकडे आमदार डॉ. फुके यांनी अन्न, नागरी पुरवठामंत्र्यांचे लक्ष वेधले होते. याशिवाय केंद्र सरकारकडेही पाठपुरावा करण्यात आला होता. केंद्र सरकार व अन्न, नागरी पुरवठा मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. केंद्र सरकारने धान खरेदीचे अतिरिक्त उद्दिष्टसाठी राज्य सरकारला परवानगी दिली. अन्न, नागरी पुरवठा मंत्रालयाने यासंदर्भात ८ जूनला राज्य सहकारी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांना २०२५-२६ वर्षातील किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत धान खरेदीचे उद्दिष्ट २ लाख मेट्रिक टनपर्यंत वाढवून दिले असून त्यानुसार धान खरेदी करण्यात यावी, असे आदेश दिले आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत शेतकरी वंचित राहणार नाही, याबाबत काळजी घेण्याचे आदेशही व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आले आहे. त्यामुळे भंडारा, गोंदियासह राज्यातील इतर धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या सकारात्मक प्रतिसादासाठी आमदार डॉ. परिणय फुके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले आहेत.