पोहणे हे केवळ खेळ नाही तर जीवन कौशल्य’ – मान्यवरांचे प्रतिपादन
भंडारा :येथील जी. बी. क्लब जलतरण केंद्रात रविवार, १४ जून रोजी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ५ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ५० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तब्बल २५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवत जलतरणाचा थरार अनुभवला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लाखनी येथील जलतरणपटू उमेश सिंगनजुडे उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून प्रशिक्षक प्रा. शक्तिकर आणि विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध जलतरणपटू प्रशांत कारेमोरे व पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमार जगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुला-मुलींसह, स्त्री-पुरुष आणि दिव्यांग खेळाडूंसाठी तब्बल १९ विविध वयोगटांमध्ये या स्पर्धा पार पडल्या. ५ ते ५० वर्षांपुढील वयोगटातील जवळपास २५० स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.
स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान नागपूर विभागीय संघटनेचे डॉ. जयपराग दुबळे यांनी भूषविले. यावेळी सचिव रोशन चौधरी, शाम फाळके, सुरेश घोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणाले की, “पोहणे हे केवळ एक खेळ नसून ते अत्यंत महत्त्वाचे जीवन कौशल्य आहे. शारीरिक तंदुरुस्ती आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने पोहणे शिकलेच पाहिजे.”
या शानदार जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन जलतरण जी. बी. क्लब यांच्या विद्यमाने विद्यमाने करण्यात आले होते. यशस्वी आयोजनाची संपूर्ण जबाबदारी प्रशिक्षक मयूर राखडे यांनी पार पडली तर कार्यक्रमाचे अत्यंत खुमासदार संचालन डॉ. नरेंद्र कुंभरे यांनी केले.
“अशा स्पर्धांमधूनच भविष्यातील चॅम्पियन घडतील.” “भंडारासारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जलतरण स्पर्धेचे आयोजन होणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. ५ वर्षांच्या मुलांपासून ते ५० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. आजच्या या स्पर्धेत सहभागी होताना आणि विजय मिळवताना मला खूप आनंद झाला. अशाच स्पर्धांमधून राज्याला आणि देशाला उत्कृष्ट जलतरणपटू मिळतील.”
प्रशांत कारेमोरे (प्रसिद्ध जलतरणपटू, स्पर्धक व विजेता)
= “जी. बी. क्लबच्या माध्यमातून या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करताना आमच्यासमोर अनेक आव्हाने होती, मात्र तब्बल २५० स्पर्धकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व श्रम सार्थकी लावणारा आहे. भंडारा जिल्ह्यातील टॅलेंटला योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावे, हाच या आयोजनामागचा मुख्य उद्देश होता.”- मयूर राखडे (आयोजक तथा जलतरण प्रशिक्षक)





