34.5 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ श्रमाला प्रतिष्ठा देण्यासाठी या सर्वेक्षणामध्ये सहभागी व्हावे:डॉक्टर मंगेश गोंदावले

श्रमाला प्रतिष्ठा देण्यासाठी या सर्वेक्षणामध्ये सहभागी व्हावे:डॉक्टर मंगेश गोंदावले

0
8

blank

जिल्ह्यात नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण आजपासून सुरू

गोंदिया, दि. 15: केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मार्गदर्शनात तसेच अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयमार्फत नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण (periodic labour force survey ( PLFS) ) आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (annual survey of uni corporation sector enterprises (ASUSE ) )आज पासून सुरू झाले असून श्रमाला प्रतिष्ठा देण्यासाठी या सर्वेक्षणामध्ये सहभागी होऊन नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी या दोन्ही सर्वेक्षणाच्या शुभारंभ प्रसंगी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी श्री गोंदावले यांच्या हस्ते आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेर, जिल्हा सांख्यिकी विभागाचे उपायुक्त सुनील धोंगडे, जिल्हा कृषी अधिकारी निलेश कनवडे, सर्वेक्षण करणारे अन्वेषक यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन्ही सर्वेक्षणाचा शुभारंभ झाला.महाराष्ट्रात पी एल एफ एस आणि ए एस यु एस इ हे दोन्ही सर्वेक्षण जागतिक बँकेच्या सहाय्याने आणि महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागामार्फत महा स्ट्राइड प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत आहे.

नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण

नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण ( PLFS) या माध्यमातून रोजगाराबाबत अद्यावत माहिती मिळणार आहे. जिल्ह्यातील स्त्री व पुरुष कामगारांचा प्रत्यक्ष सहभाग , ग्रामीण व शहरी बाजारातील रोजगार व बेरोजगार यांची सद्यस्थिती निश्चित माहिती उपलब्ध होणार आहे.

यातून मिळालेली माहिती जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील श्रमशक्ती रोजगाराची रचना आणि रोजगाराच्या आकडेवारीच्या प्राथमिक अधिकृत स्त्रोत आहे या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील आणि महाराष्ट्राच्या रोजगार परिस्थितीबाबत अचूक व विश्वासार्ह माहिती उपलब्ध होईल जी धोरणे निश्चिती योजना आखणी आणि विकास कार्यक्रमाचे अंमलबजावणीसाठी आवश्यक असणार आहे.

या सर्वेक्षणाद्वारे वेगवेगळ्या क्षेत्रातील रोजगारांच्या स्थितीचा अचूक आढावा घेण्यात येईल. कौशल्य विकास कार्यक्रमांना दिशा देण्याकरिता व रोजगार निर्मितीच्या प्रभावी योजना राबविण्यासाठी पी एल एफ एस सर्वेक्षण निर्णायक ठरेल.सर्वेक्षणातून प्राप्त माहिती ही जिल्ह्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा अंदाज तयार करण्यास उपयुक्त ठरेल. रोजगार स्थिती नुसार कामगारांची विविध वर्ग उदाहरणार्थ नियमित वेतनधारक, स्वयंरोजगार, अनौपचारिक क्षेत्रातील कामगार यांचे प्रमाण समजण्यास मदत होते. त्याचप्रमाणे विविध निर्देशांकांची मोजणी करण्यात येते. जसे श्रम बल सहभाग दर (एल एफ पी आर) कामगार लोकसंख्या गुणोत्तर (डब्ल्यू पी आर) आणि बेरोजगार दर ( यु आर) व त्यामुळे अर्थव्यवस्थेतील रोजगार आणि स्थैर्याबाबत अंदाज येतो.

असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण

असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण ( ASUSE) च्या सर्वेक्षणातून उत्पादन व्यापार व इतर सेवा क्षेत्रातील असंघटित, बिगर कृषी आस्थापनाकडून माहिती घेतली जाणार आहे. यामध्ये उद्योग व्यापार व सेवा क्षेत्रातील आस्थापना चालविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी व त्यामधून उत्पादित होणारी वस्तू व सेवा याबाबत आर्थिक व कार्यात्मक माहिती घेण्यात येईल.

या सर्वेक्षणाद्वारे प्राप्त माहिती शास्त्र पद्धतीने तयार केलेल्या नमुना पद्धतीद्वारे संकलित करण्यात येणार आहे. अर्थव्यवस्थेतील असंघटित बिगर कृषी क्षेत्रांमधील लहान उत्पादक व्यापारी आणि सेवाप्रदाता क्षेत्रातील जसे वाहतूक, शिक्षण, आरोग्य इत्यादी यांची आर्थिक आणि कार्यात्मक वैशिष्ट्ये मोजण्याकरिता वापरली जाणार आहे. यामुळे या क्षेत्रातील उद्यमांचे स्वरूप, आकार, कार्यपद्धती, संसाधने, उत्पादन आणि सेवांची वितरण, खर्च आणि उत्पन्न यांची सविस्तर माहिती मिळते.

या सर्वेक्षणाच्या प्राप्त आकडेवारी मधून आपल्या जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची सद्यस्थिती जाणून घेऊन आपल्या जिल्ह्याचे आर्थिक विकासाच्या मोजमापा करिता विविध निर्देशांक परीगणित करण्यात येणार आहेत. या सर्वेक्षणाच्या आकडेवारी द्वारे रोजगार निर्मिती आणि जिल्ह्याच्या एकूण उत्पादनात झालेली वाढ परीगणित करण्यासाठी तसेच योजना तयार करण्यासाठी, धोरणात्मक नियोजन करण्याकरिता हे सर्वेक्षण महत्त्वाचे आहे.हे सर्वेक्षण संपूर्ण वर्षभर केले जाणार असून गोंदिया जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागातील पी एल एफ एस चे 72 घटकांचे आणि ए एस यु एस इ चे 49 घटकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

ही संपूर्ण माहिती अशा स्त्रोक्त व तांत्रिक पद्धतीने निवड करण्यात आलेल्या कुटुंबाची माहिती संकलित करण्यात येणार आहे निवड झालेल्या घरी आलेल्या कुटुंबाने अन्वेषकाला माहिती देऊन सहकार्य करावे. प्राधिकृत प्रतिनिधी घरी येऊन आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ( टॅबलेट अथवा लॅपटॉप द्वारे) संकलित करतील. नागरिकांकडून संकलित केलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे. या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगाचे वार्षिक सर्वेक्षण गटात मोडणाऱ्या संस्था, तसेच एकल व्यक्ती यांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मंगेश गोंदवले यांनी केले. यामुळे जिल्ह्यातील पायाभूत बाबींवर योग्य निर्णय येत्या काळात घेतले जातील.