38.8 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ पोलिसांच्या रक्तदान शिबिरांत जमा झाले 503 युनिट रक्त

पोलिसांच्या रक्तदान शिबिरांत जमा झाले 503 युनिट रक्त

0
7

blank

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रविवारी तीन ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रक्तदानात एकूण 503 युनिट रक्त एकाच दिवशी जमा झाले.

जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संकलन केंद्र आणि अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयाचे रक्त संकलन केंद्र यांच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे 170 युनिट, उपमुख्यालय प्राणहिता येथे 228, तर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिरोंचा येथे 105 युनिट असे एकूण 503 युनिट रक्त जमा झाले. आतापर्यंत पोलिसांनी एकूण 6 रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून आजपर्यंत 4864 युनिट रक्तदान केले.

blank
रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करताना पोलीस अधीक्षक एम.रमेश

सन 2004 पासून 14 जून हा दिवस जगभरात रक्तदाता दिवस म्हणून पाळला जातो. रक्ताची आवश्यकता, त्याची मागणी व त्याच्या गरजेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि रक्तदात्यांचा सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी हा जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून रविवारी गडचिरोली पोलीस दलामार्फत तीन ठिकाणी शिबिर घेण्यात आले.

या शिबिरांमध्ये अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी.जे., उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक, तसेच विविध शासकिय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफचे पोलीस अधिकारी व अंमलदार, यासोबतच पोस्टे/ उप-पोस्टे/ पोमकें स्तरावरुन आलेल्या नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवून “रक्तदान हेच श्रेष्ठदान” ही सामाजिक भावना उराशी बाळगुन रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिरादरम्यान पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी सांगितले की, ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानाने आपल्याला मिळत असते. तसेच समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण सर्वांनी किमान तीन महिन्यातून एक वेळा तरी रक्तदान करणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. यासोबतच रक्तदानामध्ये सहभाग नोंदवणारे अधिकारी, अंमलदार यांना पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट 3030 येथील टीमने, तसेच पोलीस उपमुख्यालय अहेरी (प्राणहिता) येथे शालिनीताई मेघे रक्तकेंद्र नागपूर येथील टीमने आणि सिरोंचा येथे उपजिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र अहेरी येथील टीमने उपस्थित राहून रक्त संकलन करण्याचे काम केले.

रक्तदान शिबिरात पोलीस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे, पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.छाया ऊईके, पोलीस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॅा.सुनील मडावी, ट्रायबल वेलफेअर कमिटी इंटरनॅशनल, नागपूरचे डिस्ट्रीक्ट चेअरमन राजीव वरभे, मेघे रक्तपेढी नागपूरचे अश्विन रडके उपस्थित होते.या उपक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/ उप-पोस्टे/ पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे पोउपनि. चंद्रकांत शेळके, पोलीस कल्याण शाखेचे पोउपनि. नरेंन्द्र पिवाल, जनसंपर्क शाखेचे पोउपनि.प्रतिक भदाणे व सर्व शाखांचे अधिकारी आणि अंमलदार, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या टिमने परिश्रम घेतले.