वर्धा, दि.17 जून : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६” मधील अन्यायकारक अटी व निकषांच्या निषेधार्थ आज वर्धा येथील महात्मा गांधी पुतळा परिसरात वर्धा जिल्हा शेतकरी-कामगार आंदोलन समन्वय समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी शासनाच्या कथित फसव्या कर्जमाफी शासन निर्णयाची (जीआर) प्रतीकात्मक होळी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील विविध अटींमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप केला. सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वअट न ठेवता सरसकट ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली. तसेच २०१९ पूर्वी कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारक शेतकरी यांना योजनेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनानंतर मुख्यमंत्री, महसूल मंत्री व कृषी मंत्री यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. *शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.





