गोंंदिया,दि.२०ः- महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना, नोंदणी क्र. ६१५ यांनी ग्रामविकास विभागाकडे निवेदन सादर करून जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक व वरिष्ठ सहाय्यक संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांना अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक (पुरुष) व पशुधन पर्यवेक्षक पदांवर पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
संघटनेने सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाच्या २५ टक्के जागा पदोन्नतीने भरण्याची तरतूद असली तरी जिल्हा परिषदेत अनेक कर्मचारी १५ ते २० वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावत असूनही त्यांना या पदासाठी पात्र ठरण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे अनुभवी व सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे.
तसेच आरोग्य सेवक (पुरुष) व पशुधन पर्यवेक्षक पदांसाठी पूर्वी लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध होती. मात्र नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे शैक्षणिक व तांत्रिक पात्रता धारण करूनही अनेक कनिष्ठ व वरिष्ठ सहाय्यक कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहत आहेत.
संघटनेने शासनाकडे मागणी केली आहे की, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक, पशुधन पर्यवेक्षक तसेच तत्सम गट-क पदांवरील पदोन्नतीच्या जागांमध्ये कनिष्ठ सहाय्यक व वरिष्ठ सहाय्यक संवर्गातील आवश्यक शैक्षणिक पात्रता व सेवाज्येष्ठता पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पात्र मानण्यात यावे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा योग्य उपयोग होईल, सेवाज्येष्ठतेचा सन्मान राखला जाईल आणि पदोन्नतीच्या संधींमध्ये समानता निर्माण होईल.
संघटनेचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर होऊन प्रशासनाला अधिक अनुभवी व सक्षम मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्यामुळे शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.





