36.5 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ नगराध्यक्षांनीच आणला पालिकेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर

नगराध्यक्षांनीच आणला पालिकेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर

0
34

गोंदिया : पालिकेतील गैरप्रकार नवीन राहिलेला नाही. मात्र काही महिन्यापुर्वीच सत्तारुढ झालेले नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी गोंदिया नगर परिषदेचा कार्यारंभाला चांगलीच सुरुवात केली असून गैरप्रकारालाही ते वाव देत नाही. अशात एका प्रकरणातील भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणला तसेच संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका, अशी तक्रार मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
सविस्तर असे की, नगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक १२ येथील रामेश्वर मंदिर व बसंत टॉल जवळ सामाजिक सभागृहाचे बांधकाम सुरू होते. या कामाचे कंत्राट ८ जानेवारी २०२६ रोजी दलित उत्तर योजनेअंतर्गत महाराष्ट्र ट्रेडर्सला देण्यात आलेहोते. सामाजिक सभागृहाचे बांधकाम दरम्यान स्थानिक अर्जदार सौ. पुष्पांजली बैस व श्रीमती सिमा फुंडे यांचा ये-जा करण्याचा मुख्य रस्ता बंद केला असल्याने तसेच सदर प्रकरण मा. २ रे सह दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर गोंदिया येथे या जागेबाबत प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने अपर तहसिलदार यांचे आदेशानुसार, मुख्याधिकारी नगर परिषद गोंदिया यांनी सदर सुरु असलेले काम तात्काळ प्रभावाने बंद करण्याबाबत पत्र देण्यात आले होते.
तसेच सदर कामाची पाहणी केली असता, काम पुर्ण न करता दिशाभूल करून देयके तयार करून बिलांची उचल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कंत्राटदाराने अंदाजित खर्चानुसार काम पूर्ण केले नाही आणि नगरपालिकेच्या अभियंत्यासोबत संगनमत करून, संपूर्ण कामाचे बिल तयार
केले आणि संपूर्ण बिलाची रक्कम मिळवण्यासाठी ते लेखा विभागाकडे पाठवले. ही माहिती मिळाल्यानंतर, नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी या प्रकरणाची चौकशी केली आणि कंत्राटदाराने नगरपालिकेच्या अंदाजित खर्चानुसार काम पूर्ण केले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर, त्यांनी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी संदीप बोरकर यांच्याकडे महाराष्ट्र ट्रेडर्सला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करत लेखी तक्रार २७मे रोजी दाखल केली. तसेच मा. २ रे सह दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर गोंदिया येथे या जागेबाबत प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने अपर तहसिलदार यांचे आदेशानुसार, मुख्याधिकारी नगर परिषद गोंदिया यांनी सदर सुरु असलेले काम तात्काळ प्रभावाने बंद करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.