तिरोडा-केंद्र व राज्य सरकारकडून शेतकरी, युवक आणि महिलांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवार, दि. २९ जून रोजी सकाळी ११.०० वाजता तिरोडा येथील गांधी पुतळ्याजवळ भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनात तिरोडा विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच आपापले ट्रॅक्टर व बैलगाड्या घेऊन उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार दिलीप बन्सोड करणार असून, तिरोडा तालुकाध्यक्ष रमेश टेंभरे, गोंदिया तालुकाध्यक्ष रमेश आंबुले आणि गोरेगाव तालुकाध्यक्ष जगदीश येरोला यांनी शेतकरी, युवक व महिलांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी, युवक आणि महिलांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.




