27.6 C
Gondiā
Saturday, July 11, 2026
Home विदर्भ वृक्षधरा फाउंडेशनच्या पुढाकारातून फत्तेपूर येथे भव्य वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ

वृक्षधरा फाउंडेशनच्या पुढाकारातून फत्तेपूर येथे भव्य वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ

0
17

गोंदिया, दि. ११ : पर्यावरण संवर्धन व हरित भविष्यासाठी वृक्षधरा फाउंडेशन आणि शाळा व्यवस्थापन समिती, फत्तेपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा, फत्तेपूर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती श्रीमती दीपाताई सुधीर चंद्रिकापुरे तसेच माजी जिल्हा परिषद सभापती व पंचायत समिती सदस्या श्रीमती शैलजाताई सोनवाणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगत प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य किशोर आंबुले यांनी उत्कृष्ट समन्वयातून पार पाडली. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.यावेळी ग्रामपंचायत फत्तेपूरचे सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक-शिक्षिका, ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच वृक्षधरा फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यालय परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन आणि स्वच्छ पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. उपस्थित सर्वांनी पर्यावरण रक्षण, वृक्षसंवर्धन आणि निसर्गाचा समतोल राखण्याची सामूहिक शपथ घेतली.यावेळी वक्त्यांनी केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संगोपन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचे सांगितले. प्रत्येकाने एक तरी वृक्ष जगविण्याचा संकल्प केल्यास भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ, हिरवेगार आणि सुरक्षित पर्यावरण मिळू शकते, असे मत व्यक्त करण्यात आले.

वृक्षधरा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, संस्था अनेक वर्षांपासून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी सातत्याने कार्यरत असून “लावलेला प्रत्येक वृक्ष मोठा होईपर्यंत त्याचे संरक्षण” हेच संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. अधिकाधिक नागरिकांना पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत सहभागी करून हरित महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.